शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच
By admin | Published: October 17, 2015 03:21 AM2015-10-17T03:21:22+5:302015-10-17T03:21:22+5:30
शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने मोकळा झाला आहे
मुंबई : शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने मोकळा झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला मैदान देण्यास विरोध केला मात्र न्यायालयाने तो फेटाळला. शिवसेनेचे विभागप्रमुख व आमदार अॅड. अनिल परब यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त करताना मनसेच्या भूमिकेवर टीका केली.
सार्वजनिक मैदानांवर जाहीर सभा, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास न्यायालयाने विरोध केला होता. त्यातून मार्ग काढण्याकरिता सरकारने एमआरटीपी कायद्याच्या कलम ३७ (अ) कलमात बदल केला व खेळांव्यतिरिक्तचे दिवस ३० दिवसांवरून ४५ दिवस असे वाढवले. या ४५ दिवसांचे वाटप कसे करणार त्याचा निर्णय सरकारने अर्ज मागवून १ नोव्हेंबरच्या दरम्यान करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
राज्यातील भाजपा प्रणीत सरकारने मागील वर्षीच्या १ नोव्हेंबर रोजी हे दिवस निश्चित करण्याची प्रक्रिया पार पाडली नव्हती. त्या वेळी ३१ आॅक्टोबर रोजी राज्यात सरकार स्थापन झाले व त्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला नव्हता. त्यामुळे ही प्रक्रिया पार पाडणे शक्य झाले नाही. मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकरिता त्या ४५ दिवसांतील एक दिवस देणे शक्य आहे, असे राज्य सरकारने न्यायालयात स्पष्ट केले. मात्र मनसेने न्यायालयात अर्ज करून आम्हाला शिवाजी पार्क मैदान नाकारण्यात आले होते. त्यामुळे सर्वांना समान न्याय हे तत्त्व धाब्यावर बसवले गेले, असा दावा केला. मात्र मनसेची विनंती अमान्य करताना शिवसेनेला मैदान देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेनेला आपल्या दसरा मेळाव्याकरिता शिवाजी पार्क मैदान मिळाले ही निश्चित आनंदाची घटना असून, शिवसेना मोठ्या उत्साहात हा मेळावा साजरा करील. मात्र मनसेने शिवसेनेला मैदान मिळू नये याकरिता अर्ज करून कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले.
- अॅड. अनिल परब, आमदार