स्वबळावरील सत्तेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू!

By admin | Published: March 3, 2017 06:28 AM2017-03-03T06:28:28+5:302017-03-03T06:28:28+5:30

मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याकरिता शिवसेनेने प्रयत्न सुरू केले

Shivsena's efforts for the power of the people | स्वबळावरील सत्तेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू!

स्वबळावरील सत्तेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू!

Next

संदीप प्रधान,
मुंबई/ठाणे- मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याकरिता शिवसेनेने प्रयत्न सुरू केले असून भाजपाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे इतकेच काय एमआयएमचे सहकार्य घेण्याकरिता शिवसेनेचे वेगवेगळे नेते या पक्षाच्या नेत्यांशी बैठका करीत आहेत. शिवसेनेचे महापालिकेतील गणित जुळले तर राज्य सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडून सरकारला अडचणीत आणण्याची खेळी विरोधक खेळणार आहेत.
महापौरपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवारांमध्ये थेट लढत झाली आणि सर्वच्या सर्व नगरसेवकांनी मतदान केले तर विजयाकरिता ११४ मतांची गरज आहे. मात्र तिसरा उमेदवार रिंगणात उतरला तर ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी होईल. काही पक्षाच्या सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला तर उपस्थित सदस्यांनुसार बहुमत निश्चित होईल. या सर्व बाबींचा विचार करता शिवसेनेने स्वबळावर महापौर बसवण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
महापौरपदाची निवडणूक ही शिवसेनेकरिता महत्त्वाची आहेच. पण त्यापेक्षा स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेला भाजपाकडे जाऊ द्यायचे नाही. महापालिकेच्या आर्थिक नाड्या स्थायी समितीशी जोडलेल्या असल्याने ही समिती व शिक्षण समिती आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता शिवसेनेची खरी धडपड सुरू आहे.
उत्तर प्रदेश निवडणूक टाकणार प्रभाव
उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्रातील राजकारणात जलद घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ८ मार्च रोजी महापौरपदाची निवडणूक घेण्याऐवजी ती ९ मार्च रोजी घेण्याचा शिवसेनेचा आग्रह होता. कारण तोपर्यंत उत्तर प्रदेश निवडणुकीचे मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होणार होते. काँग्रेसने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष शिवसेनेला मदत केली तर त्याचे परिणाम शेवटच्या टप्प्यातील मतदानावर होऊ नये व अखिलेश यादव-राहुल गांधी यांच्या आघाडीला डोकेदुखी होऊ नये याकरिता शिवसेना-काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र तो अपयशी ठरला.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या हालचाली काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केल्या असून त्यावर शिवसेनेने ठरावाच्या बाजूने मतदान केल्यास सरकार अल्पमतात येईल. यूपीतील निकाल उत्तम लागले तर भाजपा महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेऊ शकेल, अशी चर्चा आहे. मात्र भाजपा वगळता सर्वच पक्ष नोटाबंदीने व स्था. स्व. संस्थांमध्ये पराभूत झाल्याने या निवडणुकांना सामोरे जाण्याची त्यांची किती तयारी असेल याबाबत शंका आहेत.
>शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाचे डावपेच
८ मार्च रोजी महापौरपदाची निवडणूक ठेवून उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला कोंडीत पकडण्याची खेळी भाजपाने केली आहे, तर दुसरीकडे अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांना बोलावणे धाडून शिवसेनेचा एक पाठिंबा काढून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पाठिंब्याच्या मोबदल्यात आणखी काही पदरात पाडून घेण्यासाठी अभासेची धडपड सुरू आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी गीता गवळी ‘मातोश्री’वर आज दुपारी गेल्या होत्या़ तेथे त्यांनी स्थायी समितीचे सदस्यत्व, आरोग्य समितीचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली. मात्र तेवढ्यातच त्यांना मुख्यमंत्र्यांकडून दूरध्वनी आल्याने त्या तेथून ताबडतोब ‘वर्षा’वर गेल्या.
मुंबईत पर्याय
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८८ सदस्य असून आणखी दोन जण त्या पक्षासोबत आले तर सदस्यसंख्या ९० होणार आहे. शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांखेरीज काँग्रेसने आपला उमेदवार दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांची अनुक्रमे ९ व ७ मते घेऊन शिवसेना आपला महापौर बसवू शकते.
शिवसेनेकडे असलेली ९० मते आणि राष्ट्रवादी व मनसेची मते घेऊन १०६ मतांच्या जोरावर शिवसेना आपला महापौर बसवू शकते. काँग्रेसने निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घ्यायची. शिवसेनेच्या ९० मतांवरच भाजपाने हल्ला चढवला व फाटाफूट करण्याचा प्रयत्न केला असेल तर काँग्रेसमधील १५ ते १७ नगरसेवकांचा गट फोडून आपला महापौर बसवायचा. यापूर्वी १९९६ मध्ये काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार पुष्पकांत म्हात्रे यांचा शिवसेनेने २२ नगरसेवक फोडून पराभव केला होता.
>ठाण्यात सेनेतर्फे मीनाक्षी शिंदे यांचा अर्ज
शिवसेनेने महापौरपदाकरिता मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदाकरिता रमाकांत मढवी यांचे अर्ज दाखल केले. भाजपाने आशादेवी सिंग व मुकेश मोकाशी यांंचे अर्ज अनुक्रमे महापौर व उपमहापौरपदाकरिता दाखल केले.
मुंबईत शिवसेना स्वबळावर जात असल्याने ठाण्याच्या महापौरपदाच्या ६ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता भाजपाने आपले उमेदवारी अर्ज दाखल करून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही अशरीन राऊत व आरती गायकवाड यांचे अर्ज भरले. काँग्रेसचे केवळ तीन सदस्य असताना विक्रांत चव्हाण यांनी उपमहापौरपदाकरिता अर्ज दाखल केला. ठाणे महापालिकेत शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असून भाजपाचे २३ तर राष्ट्रवादीचे ३४ नगरसेवक आहेत.
>स्पष्ट बहुमत असल्याने आणि ठाणेकरांनी कौल दिला असल्याने आमचाच महापौर होणार असून ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही आणखी महत्त्वाची पावले उचलणार आहोत.
- एकनाथ शिंदे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री
आम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि त्याच मुद्द्यावर आमचा महापौरदेखील होईल.
- संदीप लेले,
ठाणे शहराध्यक्ष, भाजपा
कोणतीही निवडणूक ही महत्त्वाची असते. आमचे संख्याबळ कमी जरी असले तरीदेखील आम्ही लढा देऊ.
- आनंद परांजपे,
ठाणे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

Web Title: Shivsena's efforts for the power of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.