शिवसेनेची यादी ‘मातोश्री’वर
By admin | Published: January 26, 2017 02:13 AM2017-01-26T02:13:55+5:302017-01-26T02:13:55+5:30
महापालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने, उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ उडाली असून,
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने, उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ उडाली असून, शिवसेनेने दोन दिवसांत साडेआठशे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर, बुधवारी उमेदवारांच्या नावांची यादी ‘मातोश्री’ वर सादर केली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (दि. २७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असून, अद्याप सेना-भाजपाची युती वा कॉँगे्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फैसला झालेला नाही. मनसेने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिल्यामुळे त्यांची कोणाशी बोलणी करण्याचा प्रश्न निर्माण होत नसला, तरी ज्या प्रभागात उमेदवार नाही, अशा प्रभागात समविचारी पक्षांची छुपी युती करून पॅनल पूर्ण करण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या असल्या, तरी शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दोन दिवसांत साडे आठशे इच्छुकांच्या मुलाखती सेनेच्या नेत्यांनी घेतल्या आहेत. काही प्रभागांमध्ये अगोदरच उमेदवार निश्चित झालेले असून, काही प्रभागात ऐन वेळी इच्छुक मुलाखतीसाठी दाखल झाले आहे. सेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी ज्या प्रभागात रस्सीखेच आहे, अशा ठिकाणच्या उमेदवारांबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. तथापि, विद्यमान नगरसेवकांचा अपवाद वगळता, त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली, तरी नव्याने झालेली प्रभागरचना व झालेला विस्तार पाहता, पॅनलमधील उर्वरित अन्य उमेदवारांबाबतही विचार केला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते व काही पदाधिकारी मुंबईला रवाना झाले असून, दोन दिवस झालेल्या मुलाखतींचा अहवाल ते मातोश्रीला सादर करणार आहेत. त्यानंतर, साधारणत: रविवारी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.