विधान परिषद निवडणूक , ५३१ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेची जुळवाजुळव

By Admin | Published: May 27, 2016 07:12 PM2016-05-27T19:12:08+5:302016-05-27T19:12:08+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आता रंगतदार स्थितीत आला आहे.

Shivsena's match to reach the magic figure of Vidhan Parishad elections, 531 | विधान परिषद निवडणूक , ५३१ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेची जुळवाजुळव

विधान परिषद निवडणूक , ५३१ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेची जुळवाजुळव

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. २७-  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आता रंगतदार स्थितीत आला आहे. बविआची एकगठ्ठा मते राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार असल्याने एकेका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांची जुळवाजुळव करून ५३१ ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी आता शिवसेनेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या स्वत:चे असे सुमारे २९४ मतांचे मताधिक्य असून उर्वरित जमवाजमव करून ४३९ पर्यंतची मजल त्यांनी मारली आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत ५३१ ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी आता सर्वच मंडळी कामाला लागली आहे. या निवडणुकीत विद्यमान उपसभापती राष्ट्रवादीचे वसंत डावखरे विरुद्ध शिवसेनेचे रवींद्र फाटक असा सामना दुसऱ्यांदा रंगणार आहे. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत फाटकांचा ४६ मतांनी पराभव झाला होता. परंतु, सध्याची स्थिती पाहता शिवसेना-भाजपाचे पारडे जड असले तरी कोणताही दगाफटका सहन करण्याची मानसिकता त्यांच्यात नसल्याने एकेका मतासाठी शिवसेनेची सर्वच मंडळी फिल्डिंग लावून आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याच्या कार्यालयात सध्या आकड्यांची जुळवाजुळव सुरू असून आपल्या पक्षातील, मित्रपक्षातील आणि इतर पक्षांतील नेमके किती नगरसेवक आपल्या बाजूने ठामपणे उभे राहणार आहेत, याची बेरीज-वजाबाकी रोजच्या रोज सुरू आहे.

या निवडणुकीत एकूण १०२६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये सध्या शिवसेनेचा वरचष्मा असला तरीदेखील बविआची सुमारे ११९ मते ही थेट राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार असल्याने शिवसेनेपुढील अडचणीत थोडी भर पडली आहे. सध्याचे संख्याबळ पाहता शिवसेनेकडे मित्रपक्ष भाजपा धरून ४९१ चे मताधिक्य असले तरीदेखील त्यातील आतापर्यंत २९४ च्या आसपास मतांची ठामपणे जुळवाजुळव करण्यात शिवसेनेच्या मंडळींना यश आले आहे. उर्वरित मिळून ४३९ मतांची मजल मारली असल्याची माहिती शिवसेनेच्या खास सूत्रांनी दिली. परंतु अद्यापही मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेला ९२ मतांची गरज भासणार आहे. त्यांची जुळवाजुळव झाल्याचा दावा जरी ते करीत असले, तरीदेखील ही मते आपल्या झोळीत पाडून घेण्यासाठी शिवसेनेच्या नेतेमंडळींचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रचारासाठी मुख्यमंत्री ठाण्यात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपानेही मित्रधर्म गांभीर्याने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हाच संदेश जिल्ह्यातील सर्व भाजपाच्या नगरसेवकांपर्यंत जाण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात येणार आहेत. २८ मे रोजी दुपारी ४ वाजता ते ठाण्यात येणार असून मेळावा घेणार आहेत. वागळे इस्टेट येथील एखाद्या सभागृहात तो होणार असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Shivsena's match to reach the magic figure of Vidhan Parishad elections, 531

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.