शिवसेनेचा घोषणांचा सपाटा
By admin | Published: January 23, 2017 04:55 AM2017-01-23T04:55:29+5:302017-01-23T04:55:29+5:30
थेट वचननामा जाहीर करून एकाच वेळी सर्व आश्वासने देण्याऐवजी लोकप्रिय ठरू शकणाऱ्या एक एक घोषणेचा फटाका फोडण्याचे
मुंबई : थेट वचननामा जाहीर करून एकाच वेळी सर्व आश्वासने देण्याऐवजी लोकप्रिय ठरू शकणाऱ्या एक एक घोषणेचा फटाका फोडण्याचे नवे धोरण शिवसेनेने अंगीकारले आहे. मालमत्ता करातून मुंबईकरांची सुटका करण्याच्या आश्वासनाने अपेक्षित परिणाम साधल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बसचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले. मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबईत शिवसेनाच सत्तेवर येईल, असा दावा करतानाच, पुन्हा सत्तेत आल्यानंतर पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा आणखी दर्जेदारपणे पुरविल्या जातील, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शाळेत जायला बससाठी पैसे नाहीत, म्हणून मराठवाड्यात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. मुंबईत इतकी भीषण परिस्थिती नसली, तरी पालकांवर या खर्चाचा भार असतोच. त्यामुळे पुन्हा सत्तेत आल्यानंतर गणवेशातील शालेय विद्यार्थ्यांना बेस्ट बसमधून मोफत प्रवासाची सोय करण्यात येईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईतील शिवसेना, भाजपा युतीबाबत विचारले असता, चर्चा सुरू आहे, असा सावध पवित्रा उद्धव यांनी घेतला. भाजपाकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास श्रेष्ठी-श्रेष्ठी बोलू, असे सांगतानाच, आता तसा वेळ राहिलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
ठाणेकरांसाठी स्वतंत्र धरण, मालमत्ता करातही सूट देणार-
मुंबईप्रमाणेच ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांसाठीही शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात येईल. मुंबईप्रमाणेच ठाणे आणि उल्हासनगरकरांनाही मालमत्ता करात सूट देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. ५०० फुटांपर्यंतच्या घरात राहणाऱ्यांचा मालमत्ता कर माफ केला जाईल, तर ७०० फुटांपर्यंतच्या घरांना सूट दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
ठाण्यातील पाणीटंचाईबाबत अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. त्यावर, मुंबईकरांसाठी महापालिकेने स्वतंत्र धरण बांधले. शिवसेनेची सत्ता आल्यास ठाण्यासाठीही स्वतंत्र धरण बांधले जाईल. मुंबईसाठीचे धरण आम्ही तीन वर्षांत बांधून तयार केले होते. मात्र, केंद्र सरकारकडून त्याच्या परवानगीसाठी दहा वर्षे झगडावे लागले. ठाण्यातील धरणाबाबत केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने परवानग्या द्याव्यात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सेंट्रल पार्क, चौपाटी, क्रीडा संकुलाचे आश्वासन-
ठाणेकरांना वीकएंडला विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण असावे, यासाठी कोलशेतमध्ये ३० एकर परिसरात सेंट्रल पार्क तयार केले जाईल. या पार्कमध्ये तीन थीम पार्क, लहान मुलांसाठी प्ले झोन, तलाव असेल, असे सांगून सेंट्रल पार्कचे प्रस्तावित रेखाचित्रही उद्धव यांनी पत्रकार परिषदेते दाखविले.
खारेगाव येथे सिंगापूरच्या मरिना बेच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाची चौपाटी विकसित केली जाईल. घोडबंदर रोड येथे क्रीडा संकुल बांधू, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.
सार्वजनिक बांधकाममंत्री आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, ठाण्याचे महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, खासदार राजन विचारे, खा. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आ. सुभाष भोईर, आ. रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, शहरप्रमुख रमेश वैती, माजी महापौर अशोक वैती, हरिश्चंद्र पाटील, हेमंत पवार आदी मातोश्रीवर उपस्थित होते.