शिवसेनेचा टॅब होणार देशव्यापी? आदित्य ठाकरेनीं घेतली पंतप्रधानांची भेट
By admin | Published: August 1, 2015 03:41 PM2015-08-01T15:41:03+5:302015-08-01T16:29:21+5:30
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी टॅब कसा पर्याय ठरू शकतो, याचे सादरीकरण करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत हा उपक्रम देशव्यापी करावा अशी विनंती केली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ -विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी टॅब कसा पर्याय ठरू शकतो, याचे सादरीकरण करण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत हा उपक्रम देशव्यापी करावा अशी विनंती केली.
यावेळी त्यांनी शिवसेनेने मुंबईतील शाळांमध्ये वितरित केलेल्या टॅबचं प्रात्यक्षिक पंतप्रधानांना दाखवले. 'टॅबची ही कल्पना मोदींना फार आवडली असून त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच आपल्याकडील टॅब स्वत:जवळ ठेऊन घेतला ' असे आदित्य यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई आणि खासदार राजन विचारे आदी नेतेही उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये आतापर्यंत १२०० टॅबचे वितरण करण्यात आले आहे. टॅबचा हा उपक्रम देशव्यापी व्हावा, या उद्देशानेच आपण पंतप्रधानांची भेट घेतल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांना मी या टॅबचे प्रात्यक्षिक दाखवलं. या टॅबमध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजरातीसह विविध भाषांमध्ये आठवी, नववी व दहावी इयत्तेचा अभ्यासक्रम असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार हलका होण्यास मदत होईल. तसेच पंतप्रधानांचे 'डिजीटल इंडियाचे' स्वप्न साकारण्याचाही हा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.
सुमारे तासभर झालेल्या या भेटीत पंतप्रधानांशी फक्त शिक्षण व विकास याच मुद्यांवर चर्चा झाली, अन्य कोणतेही विषय चर्चेत नव्हते असेही आदित्य यांनी स्पष्ट केले.