गणेशोत्सवातही ‘शिवशाही’ अवतरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2016 03:58 AM2016-08-19T03:58:57+5:302016-08-19T03:58:57+5:30

एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बसची घोषणा केली. जवळपास ५00 एसी बस टप्प्याटप्प्याने ताफ्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.

Shivshahi does not end in Ganesh festival too | गणेशोत्सवातही ‘शिवशाही’ अवतरणार नाही

गणेशोत्सवातही ‘शिवशाही’ अवतरणार नाही

Next

मुंबई : एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बसची घोषणा केली. जवळपास ५00 एसी बस टप्प्याटप्प्याने ताफ्यात येतील, अशी माहिती देण्यात आली. मात्र सहा महिने उलटूनही या बस ताफ्यात आल्या नाहीत. आता गर्दीच्या गणेशोत्सव काळात तरी ‘शिवशाही’ बस एसटीत दाखल होणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात १९ आॅगस्ट रोजी एसटी महामंडळात बैठक घेतली जाणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.
प्रवाशांना चांगल्या सुविधा देता याव्यात आणि जास्तीत जास्त प्रवासी आकर्षित व्हावेत यासाठी एसटी महामंडळाने आणखी काही एसी बसेस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला. जानेवारी २0१६च्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे काही योजनांचे लोकार्पण केले. त्या वेळी शिवशाही बस सगळ्यांसमोर सादर करण्यात आली. त्यानुसार ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस अशा ५00 बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या बस ताफ्यात आणण्यापूर्वी त्यांचे ‘शिवशाही’ असे नामकरणही करण्यात आले. परंतु त्यानंतर या बस ताफ्यात आणण्याच्या हालचाली थंडावल्या. एप्रिल ते जून या गर्दीच्या हंगामात शिवशाही बस दाखल झाली नाही. त्यामुळे महामंडळाला मोठा फटका बसला.
आता गणेशोत्सवातही या बस आणण्यात एसटी महामंडळाला अपयश येत आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, त्यांनी शिवशाही बस अद्याप ताफ्यात दाखल झाल्या नसल्याचे मान्य केले. यासंदर्भात १९ आॅगस्ट रोजी बैठक घेण्यात येत असून ज्या कंपन्यांकडून शिवशाही बसचे काम केले
जाणार होते त्यांना बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

अद्याप करारच नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप करारच झाला नसल्याने बस ताफ्यात दाखल होण्यावरच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच कंपन्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. हे पाहता गणेशोत्सवात शिवशाही बस दाखल होणे कठीण असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Shivshahi does not end in Ganesh festival too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.