‘शिवशाही’ पहिल्याच दिवशी फुल्ल, १८ शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:04 AM2017-12-23T04:04:19+5:302017-12-23T04:04:28+5:30
आठवडाभरावर आलेले नववर्ष ‘इनकॅश’ करण्यासाठी प्रवासी वाहतूक साधनांमध्ये चढाओढ लागली आहे. यात आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील उडी घेतली आहे. महामंडळाची ड्रीम एसटी शिवशाही आता मुंबई-पणजी मार्गावर धावणार आहे. शुक्रवारपासून ही शिवशाही सुरू करण्यात आली. खासगी वाहतूकदारांकडून मुंबई-पणजी प्रवासासाठी ११०० रुपयांपासून तिकिटांची सुरुवात आहे. मात्र एसटीच्या ‘शिवशाही’चे तिकीट ९१३ रुपये आहे.
मुंबई : आठवडाभरावर आलेले नववर्ष ‘इनकॅश’ करण्यासाठी प्रवासी वाहतूक साधनांमध्ये चढाओढ लागली आहे. यात आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील उडी घेतली आहे. महामंडळाची ड्रीम एसटी शिवशाही आता मुंबई-पणजी मार्गावर धावणार आहे. शुक्रवारपासून ही शिवशाही सुरू करण्यात आली. खासगी वाहतूकदारांकडून मुंबई-पणजी प्रवासासाठी ११०० रुपयांपासून तिकिटांची सुरुवात आहे. मात्र एसटीच्या ‘शिवशाही’चे तिकीट ९१३ रुपये आहे.
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ‘ड्रीम सिटी’ म्हणून गोवा हे तरुणाईचे आवडीचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे महामंडळाने अत्याधुनिक शिवशाही मुंबई-पणजी मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही शिवशाही मुंबई सेंट्रल येथून सायंकाळी ५ वाजता सुटेल. पनवेल, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा, म्हापसा मार्गे पणजी येथे पहाटे ४ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. पणजी येथूनदेखील पणजी-मुंबई शिवशाही सायंकाळी ६ वाजता सुटेल. दरम्यान, पहिल्याच मुंबई-पणजी शिवशाहीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. ४५ आसनक्षमता असलेल्या शिवशाहीची ४० आसने दुपारपर्यंतच आरक्षित झाली होती.
१८ शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार -
महामंडळाच्या ताफ्यात २६० शिवशाही बस आहेत. यात महामंडळाच्या २१० आणि भाडेतत्त्वावरील ५० शिवशाहीचा समावेश आहे. राज्यातील ५०हून अधिक मार्गांवर शिवशाही धावत आहे. यात मुंबईसह कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, नांदेड, सांगली, बोरीवली, बीड, लातूर आणि चंद्रपूर या मार्गांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे लवकरच एसटीच्या शयनयान आसने असलेल्या (स्लीपर) १८ शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावतील.