उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने शिवस्वराज्य यात्रेला बसणार धक्का !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 12:58 PM2019-08-21T12:58:28+5:302019-08-21T13:00:17+5:30

आधीच अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले आहे. त्यातच आता उदयनराजे यांच्या रुपाने स्टारप्रचारकही गेल्यास, राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Shivsvarajya Yatra will be a shock due to BJP entry of UdayanRaje | उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने शिवस्वराज्य यात्रेला बसणार धक्का !

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने शिवस्वराज्य यात्रेला बसणार धक्का !

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल स्थितीत सातारा मतदार संघातून विजय मिळविणारे छत्रपती उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशाने, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या गळतीला २०१४ मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत ३० नेत्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादीमधील उर्वरित बडे नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यात उदयनराजे यांचे नाव आले आहे. याआधी उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांच्यासोबत मतभेद असल्याचे सांगत भाजपमध्य प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्याची धुरा उदयनराजे यांच्याकडे सोपविली होती. मात्र त्याचाही काही उपयोग राष्ट्रवादीला होताना दिसत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रेची घोषणा सुरू केली होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली असून छत्रपती उदयनराजे भोसले या यात्रेत स्टार प्रचारक होते. डॉ. कोल्हे छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर परिचीत आहेत. तर उदयनराजे यांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्यामुळे ही यात्रा चांगलीच गाजणार अशी शक्यता होती. मात्र सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काही काळासाठी स्थिगीत करण्यात आली आहे.

दरम्यान उदयनराजेच भाजपमध्ये जाणार या चर्चेने राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. आधीच अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले आहे. त्यातच आता उदयनराजे यांच्या रुपाने स्टारप्रचारकही गेल्यास, राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शिवस्वराज्य यात्रा अमोल कोल्हे यांना एकट्यानेच काढावी लागणार, असंच दिसत आहे.

 

Web Title: Shivsvarajya Yatra will be a shock due to BJP entry of UdayanRaje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.