सृजनाच्या नव्या वाटांचे चित्रण करणारे ‘श्लोक’
By admin | Published: January 12, 2015 01:09 AM2015-01-12T01:09:06+5:302015-01-12T01:09:06+5:30
‘श्लोक’ चित्र आणि शिल्प प्रदर्शनाला रविवारपासून जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत प्रारंभ करण्यात आला. नवे सृजन, नव्या कल्पना, नव्या विषयांची कलात्मक मांडणी आणि कलेची तरल रंगमाध्यमात
‘श्लोक’ चित्र आणि शिल्पकला प्रदर्शन : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत प्रारंभ
नागपूर : ‘श्लोक’ चित्र आणि शिल्प प्रदर्शनाला रविवारपासून जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत प्रारंभ करण्यात आला. नवे सृजन, नव्या कल्पना, नव्या विषयांची कलात्मक मांडणी आणि कलेची तरल रंगमाध्यमात आणि शिल्पकलेच्या विविध आकृतीतून झालेली अभिव्यक्ती कला रसिकांना आनंद देणारी आणि विचार करायला भाग पाडणारी होती. सृजनाच्या नव्या वाटांचे चित्रण करणाऱ्या ‘श्लोक’ प्रदर्शनात चित्रांच्या आणि शिल्पांच्या प्रवासात रसिक रमले.
या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन श्लोक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोर्ट्रेट कलावंत वासुदेव कामत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा, आ. आशिष देशमुख, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, बाल चित्रकार इशिता लिंबेकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी या चित्रप्रदर्शनाच्या शिल्पकार आणि श्लोकच्या संचालक शीतल ऋषी दर्डा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांना समोर आणण्यासाठी आणि कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्लोक’ ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यामुळेच आज श्लोकच्या प्रदर्शनातील कलाकृती पाहण्यासाठी कलारसिकांमध्ये कुतूहल होते. यंदा यात वैदर्भीय कलावंतांच्या उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना भुरळ पाडत आहेत. हे प्रदर्शन महाराष्ट्रात एकूण पाच ठिकाणी आयोजित करण्यात येते.
यात नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादचा समावेश आहे. याशिवाय गोवा येथेही या प्रदर्शनाला यंदापासून प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा शीतल दर्डा यांनी यावेळी केली.
श्लोक प्रदर्शनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील संबंधित विभागाच्या कलावंतांच्या कलाकृतींना प्रतिनिधित्व मिळते आणि त्यांच्या कलाकृती कलारसिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या प्रदर्शनामागे आहे.
गेल्या सात वर्षांत या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रादेशिक स्तरावरील गुणवत्ता आणि कलात्मकता असणाऱ्या कलावंतांना रसिकाश्रय मिळाला आणि त्यांची प्रगती झाली, याचे समाधानच मनाला आनंद देणारे आहे, असे शीतल दर्डा यांनी सांगितले. याप्रसंगी विजय दर्डा यांनी सर्व कलाकृती पाहून सहभागी कलावंतांचे अभिनंदन केले. कलेचा आत्मा हा कलावंतांची संवेदनशीलता आहे. समाजात संवेदनशीलता कमी होत असताना कलावंतांनी त्यांच्या अभिव्यक्तीद्वारे ही संवेदनशीलता समाजात पेरावी. कारण कलाकृतीतच ती शक्ती असते, असे आवाहन केले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर रसिक आणि कलावंतांनी दिवसभरात या प्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतींची प्रशंसा केली. (प्रतिनिधी)
रसिकांसाठी तीन
दिवसांची कला पर्वणी
या प्रदर्शनात विदर्भातील निवडक कलावंतांच्या कलाकृती प्रदर्शनार्थ ठेवण्यात आल्या आहेत. रंगांचा हा उत्सव नव्या जुन्या कलावंतांच्या विविध अभिव्यक्तीच्या प्रवाहाने रंगतो आहे. हे प्रदर्शन कलारसिकांसाठी १३ जानेवारीपर्यंत सकाळी १०. ३० ते रात्री ८. ३० पर्यंत खुले राहणार असून या सर्व कलाकृतींचा आनंद रसिकांना घेता येईल.
कोरा कॅनव्हास ते जिवंत पोर्ट्रेट
श्लोक प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यावर सुप्रसिद्ध पोर्ट्रेट कलावंत वासुदेव कामत यांच्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी सारेच उत्सुक होते. यासाठी मॉडेल म्हणून एमएफए कलावंत मौक्तिक काटे यांची निवड करण्यात आली. त्याची वाढलेली बारीक दाढी आणि कुरळे केस यामुळे कामत सर त्याचे पोर्ट्रेट कसे काढणार यांचे उपस्थितांना कुतूहल होते. कोऱ्या कॅनव्हासवर रंगांचा कुंचला खेळायला लागला आणि आकृत्यांची तोडमोड करतानाच हळूहळू एक चेहरा आकार घ्यायला लागला. त्यांचे पोर्ट्रेट पूर्ण झाले तेव्हा उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांची दाद दिली.