सायरस मिस्त्री यांचा अपघात झालेल्या ठिकाणी धक्काशोषक यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:42 AM2022-12-06T07:42:32+5:302022-12-06T07:43:09+5:30
पुलाच्या कठड्याजवळ क्रॅश अटेन्युएटर
कासा : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूला कारण ठरलेल्या सूर्य नदीवरील पुलाच्या कठड्याजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धक्का शोषक यंत्रणा (क्रॅश अटेन्युएटर) कार्यान्वित केली आहे.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांची कार ४ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला आदळली होती. या अपघातात मिस्त्री आणि जहागीर पंडोल यांचा मृत्यू झाला होता.
वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा अधिक असल्याने अपघात झाल्याचा दोषारोप ठेवून वाहन चालवणाऱ्या महिला डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध ५ नोव्हेंबरला कासा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. अपघातास कारणीभूत ठरलेल्या सूर्या नदी पुलाच्या कठड्याआधी धक्का शोषून घेणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
असे आहे उपकरण
अपघात झाला त्या ठिकाणापासून ५० मीटर पुढे हे उपकरण लावले आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात सूर्या नदीच्या ज्या पुलाच्या कठड्यावर कार आदळून झाला, तेथे न लावता पुढे हे उपकरण लावले आहे. ज्या ठिकाणी उपकरण लावले आहे, त्या ठिकाणी वाहतूक विभागली जात असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या उपकरणावर गाडी आढळल्यास गाडीचा वेग कमी होतो आणि अपघाताची तीव्रता कमी होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.