शॉकनंतरच दुरुस्तीचा झटका येणार?
By admin | Published: June 8, 2017 01:29 AM2017-06-08T01:29:58+5:302017-06-08T01:29:58+5:30
अनेकवेळा तक्रार करूनही विद्युत विभागाकडून त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : वाल्हेकरवाडी परिसरातील गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, बळवंतनगर, चिंचवडेनगर, बिजलीनगर आदी भागातील विद्युत बॉक्स आणि फ्युज बॉक्स गेल्या काही दिवसांपासून उघड्या अवस्थेमध्ये असून, अनेकवेळा तक्रार करूनही विद्युत विभागाकडून त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
विद्युत विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. घरगुती विद्युतपुरवठा करण्याकरिता महावितरणाने मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते अशा सर्व ठिकाणी भूमिगत वाहिन्या टाकून जागोजागी विद्युत बॉक्स बसविले. परंतु या भागातील अनेक विद्युत बॉक्स उघड्या अवस्थेमध्ये आहेत. काही बॉक्सला दरवाजेच नाहीत. परिसरातील काही डीपी बॉक्समुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
बिजलीनगर स्पाईन मार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवर, तसेच गुरुद्वारा वाल्हेकरवाडी मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून विद्युतपुरवठा करणारा डीपी बॉक्स उघड्या अवस्थेत आहे. त्याचा दरवाजा निखळला आहे.
या मार्गावर अनेक ज्येष्ठ नागरिक लहान मुले घेऊन फेरफटका मारण्यास व जॉगिंगसाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी केव्हाही मोठा अपघात होऊ शकतो. या मार्गावरून अनेक नागरिक ये-जा करीत असतात.
तुकारामनगर, एकवीरा कॉलनी, ओम साई कॉलनी, चिंतामणी चौक, शिवनगरी, बळवंतनगर, चिंचवडेनगर, शिंदे वस्ती, जाधव वस्ती, साईराज कॉलनी, बिजलीनगर , रावेत, पुनावळे परिसरातील अनेक भागातील डीपी बॉक्स दरवाजा आणि कुलपाविना सतत उघड्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना या समस्येकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे, तरी संबंधित विभागाने परिसरातील उघड्या डीपी बॉक्सला पावसाळ्यापूर्वी त्वरित दरवाजे बसवावेत व प्रत्येक डीपी बॉक्सला कुलूप बसवावे, जेणेकरून डीपीचा परिसर सुरक्षित राहील अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
सध्या शाळांच्या सुटीचे दिवस असून, अनेक मुले अशा धोकादायक पद्धतीने उघड्या अवस्थेत असलेल्या डीपीजवळ सतत खेळत असतात. अशा डीपीमधून विद्युतपुरवठा सतत सुरू असतो. येथून अनेक नागरिक जा-ये करीत असतात. त्यामुळे केव्हाही अपघात होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित परिसरातील डीपी बॉक्सचे दरवाजे बसवून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कुलूप बसवावेत
- श्रीकांत धनगर
अध्यक्ष, जय मल्हार प्रतिष्ठान