बीडमध्ये मेटेंच्या अस्तित्वाला धक्का; जिल्हा परिषदेतील चौथा शिलेदारही भाजपमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 05:49 PM2019-09-05T17:49:00+5:302019-09-05T17:50:55+5:30
बीड विधानसभा मतदारसंघासाठी विनायक मेटे इच्छूक असून शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांनीही तयारी सुरू केली आहे. परंतु, या जागेसाठी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र म्हस्के यांच्या रुपाने भाजपसाठी पर्याय उपलब्ध करून ठेवला आहे.
मुंबई - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वादंग थांबण्याचे नाव घेत नाहीये. या वादात दरवेळी मेटेंनाच नुकसान होताना दिसत आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी विनायक मेटे यांचे बीड जिल्हा परिषदेतील अस्तित्वच संपुष्टात आणले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मेटेंना मोठा धक्का मानला जात आहे.
शिवस्मारक समितीचे प्रमुख आमदार विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर मेटे आणि पंकजा यांच्यातील मतभेत वाढले होते. परंतु, बीड जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी पंकजा यांनी मेटेंच्या चार सदस्यांना सोबत घेत भाजपचा झेंडा फडकवला होता. तसेच मेटेंसोबतचा वाद मिटल्याचे स्पष्ट करून शिवसंग्रामच्या जयश्री म्हस्के यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिले होते. परंतु, काही दिवसांतच पंकजा यांनी म्हस्के यांना भाजपकडे वळवले. त्यापोठापाठ शिवसंग्रामचे दोन सदस्य अशोक लोढा आणि विजयकांत मुंडे देखील भाजपमध्ये दाखल झाले.
पंकजा यांनी शिवसंग्रामचे तीन सदस्य आपल्याकडे घेत मुंडे मेटेंना जोरदार धक्का दिला. या धक्क्यांमुळे नाराज झालेल्या मेटेंनी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपला असलेला पाठिंबा काढून घेतला. राज्यात भाजपसोबत पण जिल्ह्यात नाही, अशी भूमिका मेटेंनी घेतली होती. त्यामुळे मेटे आणि पंकजा यांच्यातील मतभेद अधिकच वाढले होते. त्यातच भर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीडमध्ये दाखल झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेटेंना गाडीत घेतलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या. त्यावर भाजपला सोडून जाणाऱ्यांना जनताच उत्तर देते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मेटेंनाच लगावला होता. त्यामुळे मेटे बॅकफूटवर गेले होते.
दरम्यान बीड विधानसभा मतदारसंघासाठी विनायक मेटे इच्छूक असून शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांनीही तयारी सुरू केली आहे. परंतु, या जागेसाठी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र म्हस्के यांच्या रुपाने भाजपसाठी पर्याय उपलब्ध करून ठेवला आहे. तसेच मेटेंकडे एकमेव जिल्हा परिषद सदस्य असलेले भारत काळे यांनाही भाजपमध्ये घेतले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील मेटेंच्या शिवसंग्रामचे अस्तित्व संपुष्टात आले असून विधानसभा निवडणुकीपूर्वी मेटेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.