तानाजी सावंतांना धक्का: पोलीस संरक्षणात मोठी कपात; आधी ४८ पोलीस अन् आता उरला फक्त एक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:42 IST2025-02-18T15:42:18+5:302025-02-18T15:42:59+5:30

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाल्यानंतर त्यांना साथ दिलेल्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. प

Shock for Tanaji Sawant Big cut in police protection First 48 police and now only one left | तानाजी सावंतांना धक्का: पोलीस संरक्षणात मोठी कपात; आधी ४८ पोलीस अन् आता उरला फक्त एक!

तानाजी सावंतांना धक्का: पोलीस संरक्षणात मोठी कपात; आधी ४८ पोलीस अन् आता उरला फक्त एक!

Shiv Sena Tanaji Sawant: मुलाची बँकॉक वारी रोखल्याने चर्चेत आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना गृहविभागाने धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक नेते आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाल्यानंतर त्यांना साथ दिलेल्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु आता जीवितास धोका नसणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असून त्यात शिंदेसेनेच्या आमदारांचाही समावेश आहे.

तानाजी सावंत यांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेत राजकीय वजन वापरून ४८ पोलिसांचा समावेश करून घेतला होता. परंतु नेत्यांच्या दिमतीलाच पोलीस अडकून पडत असल्याने पोलीस प्रशासनावर ताण येत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे आता गृहविभागाने नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेत त्यांचे संरक्षण कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

तानाजी सावंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ४८ पोलिसांपैकी आता केवळ एक पोलीस कर्मचारी कायम राहणार आहे. आधीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले सावंत हे आता आमदार असून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. अशातच आता सुरक्षा व्यवस्थाही काढून घेण्यात आल्याने त्यांचे राजकीय वजन घटल्याची चर्चा रंगू लागली आहे.

विमान प्रकरणाची राज्यभर चर्चा

माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याच्या कथित अपहरण नाट्याची राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुळात खरंच सावंत कुटुंबीयांना मुलगा बँकॉकला जाणार आहे, हे माहिती नव्हते? ज्यावेळी ऋषिराज मित्रांसोबत आहे हे तानाजी सावंत पत्रकार परिषदेत सांगतात, त्यावेळी चार्टर्ड परत पुणे विमानतळावर बोलावण्याएवढे हे प्रकरण गंभीर होते का? पोलिसांनीदेखील कोणतीही पडताळणी न करता तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल कसा केला? यासाठी पोलिसांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव होता का? सावंतांच्या मुलाऐवजी सर्वसामान्य व्यक्तीसोबत असे झाले असते तर पोलिसांसह अन्य यंत्रणा एवढ्याच तत्परतेने कामाला लागली असती का? असे एक ना अनेक प्रश्न या अपहरण नाट्यानंतर उपस्थित झाले होते.

Web Title: Shock for Tanaji Sawant Big cut in police protection First 48 police and now only one left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.