कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना धक्का; गंभीर आरोप करत ज्येष्ठ नेत्यानं पक्ष सोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 10:36 AM2024-08-26T10:36:13+5:302024-08-26T10:37:22+5:30
रोहित पवार कार्यकर्त्यांना नोकराप्रमाणे वागवतात, कार्यकर्ता जिवंत राहू नये अशी त्यांची कार्यपद्धती आहे असा आरोप राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्याने आरोप केला.
अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पक्ष सोडत असल्याचं कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांनी जाहीर केले आहे. पक्षांतर आणि निवडणूक लढवणं हा वेगळा भाग आहे. जर एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढेन परंतु अपक्ष लढणार नाही. रोहित पवारांच्या विरोधात जो कुणी उमेदवार असेल त्याला मदत करेन असंही मधुकर राळेभात यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना मधुकर राळेभात म्हणाले की, शरदचंद्र पवारांवर विश्वास ठेवून मी या पक्षात प्रवेश केला होता. गेली ३० वर्ष मी शिवसेनेचं काम केले. त्यानंतर मी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या तालुक्यात राष्ट्रवादीचं वातावरण तयार करण्याचं काम मी केले. रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांना जीवाचं रान केले. त्यावेळी या तालुक्यातील भूमिपुत्र असलेले माजी कॅबिनेट मंत्री यांना पाडून रोहित पवारांना निवडून आलं. परंतु रोहित पवारांचं कार्यकर्त्यांसोबत जे वागणं आहे ते मला पसंत पडलं नाही त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय या भागात भाजपानं २५ वर्ष राजकारण केले. त्यांना बाजूला सारून रोहित पवार निवडून आले त्यामागे लोकांचे कष्ट आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ होते. राम शिंदे आमदार झाल्यापासून त्यांच्या विरोधात मी कायम राहिलो. त्या विरोधाचं पाठबळ रोहित पवारांना दिले. मात्र रोहित पवार हे कार्यकर्त्याला खासगी नोकर म्हणून वागवतात. त्यामुळे त्यांच्यासोबत राहायचं नाही हे ठरवलं. रोहित पवारांची काम करण्याची पद्धत ही कार्यकर्ता जिवंत राहू नये अशी आहे. अलीकडेच स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा त्यांनी घेतला त्यात मी कार्यकर्त्यांसाठी नाही तर नेत्यासाठी आमदार आहे असं विधान केले. लोकशाहीत कार्यकर्ता हा पाया असतो. त्यामुळे पायाच त्यांना मान्य नाही त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे शक्य नाही असा आरोपही मधुकर राळेभात यांनी केला.
दरम्यान, मी आता पक्षातून बाहेर पडलोय, मी कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील वाटचाल काय करायची हे ठरवणार आहे. मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेनेत आलो होतो. मी शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख होतो. २०१९ च्या निवडणुकीत आम्ही राम शिंदेंना विरोध करून रोहित पवारांना या मतदारसंघात पुढे आणले. लोकांना आता स्थानिक माणूस हवाय. आमदार रोहित पवार कधीही लोकांना भेटत नाहीत. आमदारांना फोन केला उचलला जात नाही. त्यामुळे लोकांना स्थानिक आमदार हवाय. कार्यकर्त्याने आमदाराला फोन केला तर त्याचा फोनही आमदार उचलत नाही. ही कार्यपद्धती चुकीची आहे असंही मधुकर राळेभात यांनी म्हटलं.