शरद पवारांना धक्का; NCP च्या १० तालुकाध्यक्षांसह २ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:32 AM2022-09-16T11:32:55+5:302022-09-16T11:34:37+5:30
अलीकडेच अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती झालेली असताना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे. नवी मुंबईतील २ माजी नगरसेवकांसह १० तालुकाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.
नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडेंसह तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. अलीकडेच अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद अगदीच तोळामासा झाली आहे. एकेकाळी पक्षाचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. दरम्यान, अशातच अशोक गावडेंनी पक्ष सोडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला आता आणखी एक फटका बसला आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही पक्ष सोडणार अशा बातम्या समोर येत आहेत. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. यावर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी बोलून सांगतो असं म्हटलं. पक्ष कार्यकर्त्यांशी बोलणार म्हणजे तुमच्या मनात काहीतरी ठरलं आहे. त्यांनी मला यानंतर होय मी पक्ष सोडणार आहे असं म्हटल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. “ते जर पक्ष सोडणार असतील तर त्या ठिकाणी दुसरा अध्यक्ष असल्याशिवाय पर्याय नाही. मी अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आता ते पक्ष सोडणार, अध्यक्ष हा द्यावाच लागतो त्यामुळे नामदेव भगत यांची नियुक्ती केल्याची घोषणा करतो असं आव्हाडांनी म्हटलं होतं.
नवी मुंबईत राष्ट्रवादीला आव्हान
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. त्यात ठाणे, मुंबई, नवी मुंबईत विशेष लक्ष देण्यात आले आहे. मुंबईतही शिवसेनेचे अनेक नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. तर नवी मुंबईत अशोक गावडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत पक्ष संघटना वाढवणं राष्ट्रवादीसमोर आव्हान बनलं आहे. पुढील काही महिन्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका लागतील. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत याआधीच शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर प्रवक्तेपदाची माळ शीतल म्हात्रेंच्या गळ्यात पडली.