ठाकरेंना शिंदेंचा ‘खास’दार धक्का; १२ खासदारांसह मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत आज जोरदार शक्तिप्रदर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:29 AM2022-07-19T05:29:54+5:302022-07-19T05:31:20+5:30

शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री शिंदे त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे.

shock to uddhav thackeray shiv sena 12 mp to join eknath shinde group strong show of power by chief minister in delhi | ठाकरेंना शिंदेंचा ‘खास’दार धक्का; १२ खासदारांसह मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत आज जोरदार शक्तिप्रदर्शन!

ठाकरेंना शिंदेंचा ‘खास’दार धक्का; १२ खासदारांसह मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत आज जोरदार शक्तिप्रदर्शन!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई /नवी दिल्ली : शिवसेनेच्या ४० आमदारांचे बंड घडवून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिवसेनेचे राज्यातील १८ पैकी १२ खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता असून मुख्यमंत्री शिंदे हे मंगळवारी त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे सोमवारी दिल्लीला रवाना झाले. मंगळवारी दिवसभर ते दिल्लीत असतील. ते शिवसेनेच्या बंडखोर खासदारांची बैठक घेऊन  आमचीच मूळ शिवसेना असल्याचा दावा करतील व एनडीएमध्ये त्यांना अधिकृतपणे सामावून घेतले जाईल, असे मानले जाते. आमदारांच्या बंडाबाबतही त्यांनी हीच भूमिका घेतली होती. ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पक्षाचे लोकसभेतील नेते असून राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यांच्या जागी राहुल शेवाळेंची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. खासदारांनी वेगळी चूल मांडल्यास ठाकरे गटास कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल.

शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता असलेले खासदार 

राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, प्रतापराव जाधव, भावना गवळी, कृपाल तुमाने, संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, सदाशिव लोखंडे.

ठाकरेंसोबतचे खासदार

अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव.

उद्धव ठाकरेंवर विश्वास

खा. संजय राऊत यांच्या सोमवारी दिल्लीतील पत्र परिषदेत पाच लोकसभा सदस्य उपस्थित होते. कीर्तीकर आजारी आहेत. दादरा-नगर-हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे, असे खा. विनायक राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

स्वतंत्र राष्ट्रीय कार्यकारिणी 

- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आणखी एक धक्का देत एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यात माजी मंत्री रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांना नेतेपद दिले. 

- एकनाथ शिंदे यांना मुख्य नेते असे पद देण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या जागी शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याची भूमिका घेण्यात आलेली नाही. 

- उपनेतेपदी गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, विजय नहाटा, यशवंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

कॉमेडी एक्स्प्रेस एक विधानभवनात झाला आहे, आता स्वत:ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करून कॉमेडी एक्स्प्रेस २ सुरू झाली आहे. मूळ शिवसेना आमचीच आहे. - खा. संजय राऊत, शिवसेना

संसद अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री खासदारांची बैठक घेत असतात. यावेळी ती झाली नाही. आता उद्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत भेटीची वेळ दिली तर त्यांना नक्की भेटेन. - कृपाल तुमाने, शिवसेना खासदार, रामटेक

ही दिशाभूल असल्याचा आरोप

अनेक शिवसेना खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात होते. आज शिंदे यांच्या उपस्थितीत आमदारांची जी बैठक मुंबईत झाली, तीत शिवसेनेचे १२ खासदार ऑनलाइन सहभागी झाले. मात्र, संजय राऊत यांनी ही माहिती दिशाभूल करणारी असल्याचे सांगितले.

लेटरबॉम्बनंतर कदमांची हकालपट्टी, अडसूळ यांनाही ठाकरेंचा डच्चू

माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांचे पुत्र आमदार योगेश हे शिंदे गटात आहेत. या लेटरबॉम्बनंतर काहीच वेळात त्यांची तसेच उपनेतेपदाचा राजीनामा दिलेले आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.

‘नेतेपदाला किंमत नाही’

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर नेतेपदाला कोणतीही किंमत नव्हती. मुलगा योगेश व मला अनेकवेळा अपमानित केले. तुमच्यावर कितीही टीका केली किंवा मातोश्रीवर कोणी काही बोलले तरी माध्यमांसमोर बोलायचे नाही असे मला निवडणुकीपूर्वी मातोश्रीवर बोलावून बजावले होते. तेव्हापासून मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे, असे टीकास्त्र रामदास कदम यांनी ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात सोडले आहे.

Web Title: shock to uddhav thackeray shiv sena 12 mp to join eknath shinde group strong show of power by chief minister in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.