धक्का लागला म्हणून युवकाची हत्या
By admin | Published: February 28, 2017 01:41 AM2017-02-28T01:41:07+5:302017-02-28T01:41:07+5:30
चौफुला (ता. दौंड) येथे एका महिलेला प्रवासादरम्यान धक्का लागल्याने एका युवकाची हत्या करण्यात आली.
केडगाव : चौफुला (ता. दौंड) येथे एका महिलेला प्रवासादरम्यान धक्का लागल्याने एका युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना आज सोमवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास घडली. ती महिला व मृत योगेश राव (रा. काळखैरेवाडी, सुपा) एका टेम्पोमध्ये प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान योगेश यांचा एका महिलेस धक्का लागला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्या वेळी टेम्पोमध्ये बसलेल्या एका युवकाने यासंदर्भात या महिलेच्या नातेवाईकांना मोबाईलवरून माहिती दिली. त्यानंतर टेम्पो चौफुला येथे आला असता या महिलेच्या नातेवाईकांनी योगेश याला घेराव घातला. त्यानंतर त्यास तिघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये योगेश यांचा जागीच मृत्यू झाला.
या वेळी आरोपी नातेवाईकांनी योगेशचा मृतदेह तत्काळ शेजारील कालव्यामध्ये टाकला. ही माहिती यवत पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. योगेश याचा मृतदेह विच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष नाळे करीत आहेत.