केळगाववर शोककळा, सिल्लोड तालुक्यातील जवान जम्मू-काश्मिरात शहीद
By Admin | Published: June 22, 2017 10:38 PM2017-06-22T22:38:59+5:302017-06-22T22:38:59+5:30
जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात सिल्लोड तालुक्यातील केळगावचा जवान संदीप सर्जेराव जाधव (३४) शहीद झाला.
>ऑनलाइन लोकमत
सिल्लोड(औरंगाबाद), दि. 22 : जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात सिल्लोड तालुक्यातील केळगावचा जवान संदीप सर्जेराव जाधव (३४) शहीद झाला. ही वार्ता कळताच केळगाववर शोककळा पसरली.
१५ वर्षांपूर्वी संदीप सैन्य दलात भरती झाला होता. त्याच्या निवृत्तीला अवघे दीड-दोन वर्षच बाकी होते. दोन महिन्यांपूर्वीच नातेवाईकाच्या लग्नासाठी संदीप सुटी घेऊन केळगावला आला होता. त्याची ही भेट अखेरचीच ठरली. केळगावातील गोकूळवाडी वस्तीवर त्याचे घर आहे. संदीप शहीद झाल्याचे कळताच गाव शोकसागरात बुडाले. ही दु:खद वार्ता रात्री उशिरापर्यंत त्याच्या घरी पोहचू दिली नव्हती. ग्रामस्थांनी त्याच्या घरात असलेल्या टीव्हीचे केबलही तोडून टाकले होते. संदीपच्या पश्चात आई, वडील, पत्नी उज्ज्वला, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, बहिण असा परिवार आहे.
यापूर्वी केळगावचे दोन जवान शहीद-
देशाचे संरक्षण करताना केळगावातील दोन जवानांना यापूर्वी वीरमरण आले आहे. माधव नारायण गावंडे हा जवान ८ जुलै २००३ रोजी, काळूबा भाऊराव बनकर हा २७ फेब्रुवारी २०१० रोजी शहीद झाला होता.
आज पार्थिव येण्याची शक्यता-
शुक्रवारी संदीपचे पार्थिव औरंगाबादेत येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ‘लोकमत’ला दिली.