Maharashtra Political Crisis: वाढदिवसाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना धक्का! शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गटात; पक्ष सोडला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 10:21 AM2022-07-27T10:21:02+5:302022-07-27T10:21:42+5:30
Maharashtra Political Crisis: विकासकामांसाठी पाठिंबा दिला असून, नाराज नाही. शिवसेनेतच आहे, असे यावेळी ते म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जात असून आता साताऱ्याचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. मी शिवसेनेतच असून पक्ष सोडलेला नाही. शिंदे हे जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने विकासकामे होण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देत आहे, असे जाधव यांनी सांगितले.
मागील महिन्यात विधान परिषद निवडणूक झाली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते असणारे एकनाथ शिंदे पक्षातील आणि अपक्ष आमदारांसह गुवाहाटीत गेले होते. त्यानंतर आल्यावर त्यांनी भाजपच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घडामोडीत मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेतून पाठिंबा वाढत चालला आहे. अनेक जण त्यांच्या गटात सामील होत आहेत. सातारा जिल्ह्यातील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
असे असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा एक मोठा धक्का बसणार आहे. चंद्रकांत जाधव हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत आहेत. त्यांनी उपजिल्हाप्रमुखपदही भूषविले आहे. त्या काळातील त्यांची आंदोलने गाजली होती. सध्या त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद होते. त्यांनी पक्ष वाढीसाठी मोठे काम केले आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्याबरोबर आणखी काही पदाधिकारीही जाण्याची शक्यता आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाची ताकद कमी होणार आहे.
दरम्यान, चंद्रकांत जाधव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे दैवत तर उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेतृत्व नाही. शिवसैनिकांसारखे जीवाभावाचे मित्र नाहीत. परंतु सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत म्हणून त्यांना पाठिंबा देत आहे. जिल्ह्यात भरीव विकासकामे व्हावीत म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर मी कोणावरही नाराज नाही. मी शिवसेनेतच आहे, पक्षही सोडला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.