धक्कादायक! आदिवासी मुलींना बाथरूममध्ये नेऊन शाळेचा संचालकच करत होता अश्लील चाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 21:43 IST2018-01-28T18:34:08+5:302018-01-28T21:43:22+5:30
जुन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्नरमधल्या येनेरे तालुक्यातील इंडियन इंग्लिश मीडियम शाळेच्या संचालकानं आदिवासी विद्यार्थिनींशीच अश्लील कृत्य केलं आहे.

धक्कादायक! आदिवासी मुलींना बाथरूममध्ये नेऊन शाळेचा संचालकच करत होता अश्लील चाळे
जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून शिक्षकांनी विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संपातजनक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेचा संस्थापक सचिन घोगरेसह दोन शिक्षकांवर पालकांच्या फिर्यादीवरून जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत जव्हार प्रकल्पातील २५० विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम शिकतात. स्कूलमधील आदिवासी विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून त्यांच्याबरोबर छेडछाड करून, विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करत शिक्षकांनी स्वतःच्या पेशाला काळिमा फासला आहे. त्यामुळे आदिवासी अस्मिता संघटना पालघर यांनी पुढाकार घेऊन आदिवासी विद्यार्थिनींना न्याय मिळण्यासाठी पालकांना हाताशी घेऊन त्या संचालकासह दोन शिक्षकांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी त्या आरोपींना अटकही केली आहे. त्यामुळे जव्हार प्रकल्पातील विद्यार्थी -पालकांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुलांसाठी मोफत खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची निवड करून आदिवासी विकास विभागाकडून निवड केलेल्या इंग्रजी नामांकित शाळांत ही मुले पाठवली जात आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण फी आदिवासी विकास प्रकल्पातून भरली जाते. मात्र जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींवर झालेला हा प्रकार घृणास्पद आहे. त्यामुळे जव्हार तालुक्यातील पालकांचीही काळजी वाढली आहे. ज्या पालकांची मुले येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदिवासी विकास प्रकल्पातील महिनाभरापूर्वी पाचगणी येथिल इंग्लिश मीडियम शाळांत डहाणू प्रकल्पामधील एका विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. तसेच या पंचगणी शाळेत मागील काही वर्षांपासून वारंवार तक्रारी येत आहेत, तरी या शाळेत प्रकल्प कार्यालय विद्यार्थी का पाठवते ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच असे प्रकार आदिवासी विकास प्रकल्पाने निवडलेल्या इंग्लिश आश्रमशाळांमध्ये घडत असल्यानं सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे आदिवासी विद्यार्थिनींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.