धक्कादायक... आणि दुसऱ्याच मृतदेहावर केला अंत्यसंस्कार
By admin | Published: May 18, 2016 09:08 PM2016-05-18T21:08:18+5:302016-05-18T22:07:19+5:30
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी आपल्याच नातलगाचा मृतदेह असल्याचे समजून दुसऱ्याचा मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १८ : येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी आपल्याच नातलगाचा मृतदेह असल्याचे समजून दुसऱ्याचा मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शवविच्छेदन विभागातील कर्मचारी प्रकाश लोंढे याला निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी दिली.
त्याचे झाले असे, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास नारायण चंद्रामप्पा चन्ना (वय ७०, तेलंगी पाच्छापेठ, सोलापूर) यांचा मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह शवविच्छेदन विभागामध्ये आणण्यात आला होता. या संदर्भात चन्ना यांच्या नातलगांना बुधवारी शवविच्छेदन करून मृतदेह देण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार आज (बुधवारी) सकाळी मयत नारायण यांचा मुलगा विलास, चंद्रकांत, चुलतभाऊ प्रकाश, अंबादास यांच्यासह नातलग शवविच्छेदन विभागात आल्यानंतर त्यांना नारायण चन्ना यांचा मृतदेह आढळला नाही. यासंबंधी विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. दोन ते तीन तास हाच प्रकार सुरू असल्याने त्यांचा संशय बळावला.
दरम्यान, चन्ना कुटुंबीय येण्यापूर्वी एक मृतदेह शवविच्छेदन विभागातून नेण्यात आला होता. यातून मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार सिव्हिलच्या प्रशासनाच्या लक्षात आला. शवविच्छेदन विभागात यापूर्वीच शेखर श्रीधर दिवाण (वय ५२, रा. कुमठा नाका, बालाजी सोसायटी, सोलापूर) यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवलेला होता. सकाळी साडेसातच्या सुमारास दिवाण यांचा भाऊ शिरीष, वहिनी आरती यांनी शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांना शेखर यांच्या मृतदेहाची मागणी केली. तेथील कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून त्यांना चेहरा दाखवला. दिवाण कुटुंबीयांनी मृतदेह बांधून शववाहिकेत ठेवण्याची विनंती केली. येथेच गफलत झाली. सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांनी चुकून शेखर यांचा मृतदेह देण्याऐवजी नारायण चन्ना यांचा मृतदेह दिवाण कुटुंबीयांना दिला. त्यांनी मृतदेह थेट मोदी स्मशानभूमीत नेला. दोन दिवसांपूर्वीचा मृतदेह असल्याने आणि दुर्गंधी सुटल्याने चेहरा न पाहता पायाचे दर्शन घेऊन मृतेदेहाचे विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले.
दरम्यान इकडे मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे लक्षात येताच सिव्हिल आणि पोलीस प्रशासन हादरले. यामुळे सर्वांची एकच धावपळ सुरू झाली. दुपारपर्यंत कोणीच काही सांगण्याच्या मन:स्थितीत नव्हते. चन्ना कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. सी. ब्लॉकमधील न्याय वैद्यकशास्त्र विभागात चन्ना कुटुंबीयांनी एकच गर्दी केली. दरम्यान, दिवाण कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले. त्यांनी, सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मयत शेखर श्रीधर दिवाण यांचा मृतदेह कापडाने लपेटून दिल्याचे सांगितले.
या साऱ्या प्रकारामुळे सिव्हिल प्रशासनाचे वाभाडे बाहेर आले आहे. चन्ना कुटुंबीयांनी दोषींवर कारवाई करण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिष्ठाता राजाराम पोवार यांनी प्रकाश लोंढे या कर्मचाऱ्याला जबाबदार धरून निलंबित केले आणि अन्य दोषींवर चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे लेखी पत्र चन्ना कुटुंबीयांना दिले.
----
चार जणांची चौकशी समिती गठित
चन्ना कुटुंबीयांच्या मागणीनुसार अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी चौकशी समिती गठित केली आहे. यामध्ये डॉ. एस. व्ही. सावस्कर (बालरोग विभाग) अध्यक्षा, डॉ. एस. के. मेश्राम (न्याय वैद्यकशास्त्र) सचिव, डॉ. ए. एन. मस्के (वैद्यकीय अधीक्षक) आणि डॉ. आर. व्ही. कटकम (सहयोगी प्राध्यापक जीव रसायनशास्त्र) सदस्य या चौघांचा समावेश आहे.
--------
मृत नारायण चंद्रामप्पा चन्ना (वय ७२) यांच्या मृतदेहासंबंधी झालेल्या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. तसेच सकृत्दर्शनी चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रकाश लोंढे यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशी समितीच्या अहवालाप्रमाणे दोषींवरही पुढील कारवाई करण्यात येईल. या घटनेबद्दल रुग्णालयाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीत आहोत.
- डॉ. राजाराम पोवार,
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर
------------
साहेब, शेवटचं दर्शनही घ्यायचं राह्यलं हो!
दुसऱ्यांनीच केला अंत्यसंस्कार: मयत नारायण चन्ना यांच्या सुनेचा टाहो
सोलापूर: विलास जळकोटकर
साहेब, प्रत्येकालाच शेवटच्या क्षणी आपल्या आप्त-स्वकीयांचे दर्शन घडावे, ही अपेक्षा असते. आमच्या नशिबात तेही घडले नाही... दुसराच कोणीतरी आमच्या सासऱ्याचा मृतदेह घेऊन जातो आणि अंत्यसंस्कारही उरकले जातात. यापेक्षा दुर्दैवी घटना ती कोणती. असा प्रसंग कोणाच्या आयुष्यात येऊ नये, अशा शब्दात मयत नारायण चन्ना यांच्या स्रुषा देविका चंद्रकांत चन्ना यांनी लोकमतशी बोलताना शोक व्यक्त केला.
सिव्हिल हॉस्पिटलमधील शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे मयत नारायण चंद्रामप्पा चन्ना (वय ७२) यांचा मृतदेह दिवाण कुटुंबीयांना देण्यात आल्यामुळे चन्ना कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली आहे. सकाळी ८ पासून या मृतदेह अदलाबदल प्रक्रियेमुळे शासकीय रुग्णालय परिसरात एकच हल्लकल्लोळ माजला. शवविच्छेदन विभाग आणि सी. ब्लॉक परिसरातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाच्या आवाराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
तेलंगी पाच्छापेठेत राहणारे मयत नारायण चन्ना हे टेलरिंंग व्यवसायात नामांकित कटर मास्टर म्हणून परिचित होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना पक्षाघाताचा आजार बळावल्याने नातलगांनी त्यांना उपचारासाठी २६ एप्रिल रोजी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. २८ एप्रिल रोजी त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये रुग्णालयाचे बिल एक लाखाहून अधिक झाले. काही दिवसांनी म्हणजे ४ मे रोजी रुग्णालयाचा खर्च झेपेना म्हणून येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हिल हॉस्पिटलमधील ट्रॉमा युनिटमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले होते. मंगळवारी रात्री त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
एकीकडे आर्थिक विवंचना, दुसरीकडे मनस्ताप अशा स्थितीत चन्ना कुटुंबीय असताना रुग्णालयाकडून झालेल्या एका चुकीमुळे आणखी मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. हा भावनिक आणि मानसिक मनस्ताप कोण भरून देणार आहे, असा भावनिक सवाल देविका चन्ना (मयत नारायण यांच्या स्रुषा), मुले विलास, चंद्रकांत, विलास यांनी अधिष्ठाता, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासनापुढे बोलताना व्यक्त केला.
किराणा दुकानावर होती गुजराण
मयत नारायण चन्ना यांना विलास व चंद्रकांत ही दोन मुले आहेत. वडील शिलाई व्यवसायात कटिंग मास्टर होते. पक्षघाताच्या आजारामुळे त्यांनी हे काम सोडले होते. दोन्ही मुले किराणा दुकान चालवतात. यावर या कुटुंबीयांची गुजराण सुरू आहे. आपल्या वडिलांचा शेवटचा अंत्यसंस्काराचा विधीही या दोघा भावांना आपल्या हातून करता आला नाही.
नातलगांची घरासमोर गर्दी
बुधवारी रात्री नारायण चन्ना यांच्या मृत्यूची वार्ता चन्ना कुटुंबीयांनी रात्रीच नातलगांना कळवल्यामुळे दुरून आलेल्या पाहुणे मंडळींनी घरासमोर गर्दी केली होती. दारापुढे मयताचे साहित्य, अंत्यविधीसाठीचा कैलासरथ येऊन उभा होता. दुपार होत आलीतरी मृतदेह घराकडे येत नसल्याने अनेक नातलगांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.
-----
अशी पटली दिवाण यांच्या मृतदेहाची ओळख
सोलापूर : एका कुटुंबीयांकडून दोन वेळा झालेल्या अंत्यसंस्कारामुळे बुधवारी शासकीय रुग्णालयाचा परिसर गोंधळाचा ठरला. शेखर श्रीधर दिवाण (वय ५२) मयत व्यक्ती एका दिवसात चर्चेचा विषय ठरली. यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता १६ मे रोजी रेल्वे स्टेशनच्या फुटपाथवर बेवारस मृतदेह म्हणून पोलिसांना आढळून आला. नातलगांची ओळख पटण्यासाठी तो छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार तथा सिव्हिल हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागात ठेवण्यात आला. १७ मे रोजी आम्हाला रात्री ८ च्या सुमारास कळाल्याने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता संबंधित मृतदेह आमच्या भावाचा असल्याची ओळख पटल्याचे शिरीष दिवाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. संबंधित कर्मचाऱ्यांना सकाळी मृतदेह घेऊन जातो, असा निरोप देऊन आम्ही बाहेर पडलो. आज (बुधवारी) सकाळी मृतदेह ताब्यात घेतला. दोन दिवसांपूर्वीची बॉडी असल्याने आम्ही अंत्यविधीच्या वेळी तो न उघडता पायाचे दर्शन घेतले. मात्र त्यानंतर पोलीस आणि सिव्हिल प्रशासनाकडून निरोप आल्यामुळे सिव्हिल येथे आल्यानंतर आम्हाला खरा काय तो प्रकार कळाला. याचा आम्हालाही अतिशय मनस्ताप झाला असल्याचे मयताचे बंधू शिरीष आणि भावजय आरती यांनी सांगितले.
सायंकाळी दुसऱ्यांदा अंत्यसंस्कार
दिवसभर चाललेल्या गोंधळामुळे चन्ना आणि दिवाण कुटुंबीयांना मोठा मनस्ताप झाला. सकाळी एकदा अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर दिवाण कुटुंबीयांना दुसऱ्यांदा सायंकाळी ६ वाजता पुन्हा एकदा मोदी विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
-----------
नातलग अन् नागरिकांकडून रुग्णालयाच्या अनास्थेचे वाभाडे
मृतदेहाच्या अदलाबदलीमुळे झालेल्या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी सी. ब्लॉकमधील न्याय वैद्यकशास्त्र विभागामध्ये अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, डॉ. सतीन मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. ए. एन. मस्के, डॉ. एस. व्ही. सावस्कर, पोलीस निरीक्षक जगताप, काझी आणि चन्ना व दिवाण कुटुंबीयांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना चन्ना कुटुंबीयांनी सिव्हिलमध्ये ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेताना कर्मचाऱ्यांकडूनही मनस्ताप झाल्याच्या व्यथा मांडत संताप व्यक्त केला. उपस्थित अन्य नागरिकांकडूनही रुग्णालयाकडून सामान्यजनांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी अधिष्ठातांनी दखल घ्यावी, अशी मागणी केली.