धक्कादायक! बीडमध्ये एचआयव्ही बाधीत मुलाच्या अंत्यसंस्कारास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 07:01 PM2019-08-11T19:01:53+5:302019-08-11T19:02:11+5:30
माणुसकी हरवली : दु:ख पचवून आईने मुलाचा मृतदेह रिक्षातून नेला ‘इन्फंट’मध्ये
- सोमनाथ खताळ
बीड : आईला एचआयव्ही आजार. मुलालाही तोच आजार. याच आजाराने १२ वर्षीय मुलाचा जीव गेला. त्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. समाजाच्या हातापाया पडूनही कोणीच पुढे न आल्याने दु:ख डोक्यावर घेऊन आईने आपल्या मुलाचा मृतदेह रिक्षात घातला आणि थेट पाली येथील इन्फंड इंडियात आणला. येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावरून समाजाचा अद्यापही एचआयव्ही बाधितांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला नसल्याचे समोर येते.
मनिषा (वय ४२, नाव बदललेले) यांचे वयाच्या पंचविसाव्या वर्षी मुकादमासोबत विवाह झाला. सुरूवातीचे काही दिवस सुखाचा संसार झाल्यानंतर मनिषाला पतीने सोडले. त्यानंतर मनिषा घराबाहेर पडून हॉटेल व इतर ठिकाणी राहून काम करू लागली. यातूनच ती गर्भवती राहिली. तिला मनोज आणि मोनिका (नाव बदलेली) अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलाला एचआयव्ही होता. साधारण दहा वर्षांपूर्वी मोनिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर मनिषा मनोजचा संभाळ करीत होती. मागील १५ दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खुपच खालावली. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सुधारणा होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी त्याला घरी नेले. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
पोटच्या गोळ्याचा मृतदेह डोळ्यासमोर ठेवून मनिषा गल्लीतील लोकांना अंत्यसंस्कारासाठी विनवणी करीत होती. मात्र, समाजाने मदत करण्याऐवजी नावेच जास्त ठेवली. कोणीच पुढे येत नसल्याने मनिषा खचली होती. काय करावे समजत नव्हते. अखेर दु:ख पचवून मनिषाने रिक्षा केला आणि त्यात मृतदेह घेऊन थेट पाली येथील इन्फंट इंडिया गाठले. इन्फंटच्या ‘वेदना’ स्मशानभुमित दुपारच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इन्फंटचे दत्ता बारगजे, संध्या बारगजे आदींची उपस्थिती होती.
आईने दूर केले, भाऊ भांडला
एचआयव्हीचा आजार झाल्याचे समजल्यावर मनिषा यांना आईने दुर केले. त्यानंतर भावाकडे गेल्यावर भाऊ सुद्धा भांडला. त्यामुळे मनिषा बेघर झाल्या होत्या. मजूरी करून त्या उदरनिर्वाह भागवित होत्या.
समाजाने मानसिकता बदलावी
एचआयव्ही हा रोग बोलल्याने, सोबत जेवल्याने, सोबत राहिल्याने, हातात हात दिल्याने होत नाही. याची कारणे वेगळी आहेत. तरीही आजही समाज या लोकांना स्विकारायला तयार नसल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे. त्यामुळे समाजाने मानसिकता बदलून या रूग्णांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. औषधोपचारापेक्षा हा आधार त्यांचे आयुष्य वाढवितो, असे मत इन्फंटचे संध्या व दत्ता बारगजे यांनी व्यक्त केले.
मृतदेहाला लागले मुंगळे
रात्रीच्या सुमारासच मनोजचा मृत्यू झाला असावा. सकाळी १० पर्यंत त्याला उचलण्यासाठी अथवा अंत्यसंस्कारासाठी कोणीच पुढे आले नाही. उशिर झाल्याने अक्षरशा: मृतदेहाला मुंगळे लागले होते.
पती मुकादम आहे. मला त्याने सोडले. मला दोन मुले. दोघांचाही मृत्यू झाला. माझ्या लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी विनवणी केली. मात्र, कोणीच पुढे आले नाही. उलट नावे ठेवली. म्हणून रिक्षा करून मुलाचा मृतदेह घेऊन इन्फंटमध्ये आले. येथे बारगजे दाम्पत्याने आधार देऊन मुलावर अंत्यसंस्कार केले. मला आजार असल्याने परिसरातील लोकांनी खुप त्रास दिला. मी उठून जावे म्हणून माझ्यावर घरावरही अनेकदा दगडफेक केली.
- मनिषा (पीडित महिला)
मृतदेह घेऊन महिला आमच्याकडे येताच सर्व कारवाई करून दफनविधी करण्यात आला. आता या आईलाही आम्ही आधार देत आहोत. सध्या इन्फंटमध्ये ६९ मुले, मुले आणि ८ महिला आहेत. या सर्वांचा सांभाळ कुटूंबातील सदस्याप्रमाणे करतोत. समाजाने मानसिकता बदलून यांना आधार देण्याची गरज आहे.