धक्कादायक; लग्न का केलं नाही म्हणून मुलाने केला आईचा गळा आवळून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:36 PM2019-05-14T12:36:41+5:302019-05-14T12:37:56+5:30
सोलापूर : आईने माझे लग्न केले नाही म्हणून मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळून खून केला, अशी कबुली देणाºया ...
सोलापूर : आईने माझे लग्न केले नाही म्हणून मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळून खून केला, अशी कबुली देणाºया पोटच्या मुलास जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार सोमवारी घडला.
मोहित विजयकुमार कायत (वय २७, रा. जोडभावी पेठ, विकास लॉजच्या पाठीमागे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विजयकुमार मोतीलाल कायत (वय ५६, रा. श्रीराम समर्थ निवास, सुरभि कॉलनी आपटे सोसायटी रोड, वारजे माळवाडी, पुणे सध्या जोडभावी पेठ विकास लॉजच्या पाठीमागे, सोलापूर) हे पत्नी नागमणी विजयकुमार कायत (वय ५२), मुलगा रोहित कायत (वय २९), मोहित कायत (वय २७) यांच्यासमवेत पुणे येथे राहत होते. मुलगा रोहित याचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता, तो नोकरीला असल्याने सर्वजण पुण्यात राहत होते. विजयकुमार कायत हे पत्नी नागमणी यांच्यासोबत भाऊ लक्ष्मीकांत कायत यांच्या सोलापुरातील घरी आले होते.
मोहित कायत हा पुण्यात डिलेव्हरीचे काम करीत होता़ ७ मे रोजी सायंकाळी ८ वाजता तो सोलापुरात लक्ष्मण कायत यांच्या घरी आला. वडिलांनी विचारणा केली असता, त्याने मला खूप त्रास होत आहे, मी मरतो माझे लग्न करा, असे म्हणाला. मोहित याला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने वडिलांनी सम्राट चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. ९ मे रोजी दुपारी ४ वाजता मोहित याला डिस्चार्ज देण्यात आला. १२ मे रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले. सकाळी ६.४५ वाजता मोहित घरासमोर बसला होता. भावजय रोहिणी आरडाओरड करू लागली. विजयकुमार कायत यांनी घरात जाऊन पाहिले असता पत्नी नागमणी कायत ही बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले. वडिलाने मोहित याला काय झाले? असे विचारले असता त्याने आई माझे लग्न करीत नसल्याने मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळला असे सांगितले. विजयकुमार कायत यांनी फिर्याद दिली आहे.
मोहित याला होते गांजाचे व्यसन...
- मोहित कायत याला गांजा पिण्याची सवय होती. तो गांजा या मादक पदार्थाच्या आहारी गेला होता, मागील एक महिन्यापासून त्याने गांजा पिणे सोडून दिले होते. गांजा सोडल्याने त्याला शारीरिक व मानसिक त्रास होत होता. त्याचे लग्न होत नसल्याने, तो मरायची भाषा करीत होता. स्वत: मरण्याऐवजी त्याने निष्पाप आईचा गळा आवळून खून केला. या प्रकारामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात होती.