मोदींचं रोजगारावर भाषण अन् परिसरातल्या 45 कंपन्या एक दिवस बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 09:56 AM2019-09-08T09:56:39+5:302019-09-08T12:28:19+5:30
शेंद्रा परिसरातील ऑरिक सिटीचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होणार असल्याने प्रशासनाकडून आठवड्याभरापासून तयारी सुरु होती.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी औरंगाबादमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील ऑरिक सिटीच्या भव्य हॉलचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाचा मोठा फटका शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना बसला आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी या परिसरातील ४५ पेक्षा अधिक कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे लहान-मोठ्या उद्योगांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
शेंद्रा परिसरातील ऑरिक सिटीचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होणार असल्याने प्रशासनाकडून आठवड्याभरापासून तयारी सुरु होती. तर शनिवारी या परिसरातील अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. शनिवार म्हणजे कंपन्याच्या आठवड्याचा पहिला दिवस असतो. मात्र मोदींच्या सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे काही ठिकाणी वेळेत बदल करून कामगारांना बोलवण्यात आले होते. तर काहींना हे शक्य नसल्याने त्यांना कंपन्या बंद ठेवावे लागले.
मोदींच्या दौऱ्यामुळे कंपन्या बंद ठेवावे लागल्याने अनेक उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे. आधीच मंदी आणि त्यात एक दिवस कंपनी बंद ठेवल्याने उद्योजकांना मोठ्याप्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शेंद्रा परिसरात राहणाऱ्या कामगारांमध्ये मोदींच्या दौऱ्याची मोठी चर्चा पाहायला मिळाली.