धक्कादायक ! मंत्रालयालाच होतोय दूषित पाण्याचा पुरवठा; 100 हून अधिक अधिकाऱ्यांना उलट्या, जुलाब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 07:39 PM2019-06-21T19:39:50+5:302019-06-21T19:48:59+5:30
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला.
मुंबई : राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून हाकला जातो तिथेच पिण्याच्या दूषित पाण्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी रूग्णालयात दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. मंत्रालयातील दूषित पाण्यामुळे जुलाब आणि वांतिचा त्रास झाल्याने अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत १०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मंत्रालयातील शासकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. तर, त्रास होत असल्यामुळे अनेकजण रजा घेऊन घरी गेले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. यावर मंत्रालयातील दूषित पाण्यामुळे कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची बाब खरी असल्याची कबुली सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्रालयात महापालिकेचा पाणी पुरवठा होतो. मंत्रलयातील पाण्याच्या टाक्या क्लोरीन टाकून नुकत्याच स्वच्छ केल्या आहेत. पाणी शुद्ध करण्यासाठीच्या प्युरिफायरचीही तपासणी आणि आवश्यक दुरूस्ती करण्यात आली होती. दूषित पाण्याच्या त्रास एकाच ठिकाणाहून होत असावा, अशी शक्यता आहे. याबाबत दोन दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत होती. त्याबाबतच्या तक्रारी होऊनही पाण्याच्या दर्जामध्ये फरक पडला नाही. मंत्रालयात हजारोंच्या संख्येने अधिकारी व कर्मचारी काम करतात. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून वैयक्तिक व सार्वजनिक कामासाठी सर्वसामान्य जनता येत असते. तरीही पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.