धक्कादायक! अनुदान लाटण्यासाठी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे 'अपहरण'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 07:44 PM2018-09-02T19:44:10+5:302018-09-02T19:51:34+5:30
अचानक या शाळेची पटसंख्या कमी होऊन ७ ऑगस्ट रोजी शाळा शून्य पटसंख्येवर आली. विद्यार्थी गेले कुठे? याचा शोध घेण्यासाठी शिक्षक गावातही गेले. मात्र, सदर विद्यार्थी गावातच नव्हते.
नरेंद्र जावरे/चिखलदरा (अमरावती) : जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पळवून नेल्याने नाईलाजास्तव शाळेला कुलूप लावावे लागले. ही धक्कादायक घटना अतिदुर्गम भागातील नवलगाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत घडली. विद्यार्थी गेले कुठे याचा शोध घेतला असता, शहरी भागातील आश्रमशाळांनी अनुदान मिळविण्यासाठी हा संतापजनक प्रकार केल्याचे उघडकीस आले.
मेळघाटात काहीपण घडू शकते, अशी एक म्हण प्रचलित आहे. त्यामुळे येथे शाळा चोरीला गेल्याचे ऐकिवात होते. आता मात्र सुरू असलेली शाळाच विद्यार्थी पळवून बंद पाडण्याचा महाप्रताप उघडकीस आला आहे. चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या नवलगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथापर्यंत शाळा आहे. दहा विद्यार्थी या शाळेत शिकत होते. दोन शिक्षक तेथे कार्यरत होते. परंतु, अचानक या शाळेची पटसंख्या कमी होऊन ७ ऑगस्ट रोजी शाळा शून्य पटसंख्येवर आली. विद्यार्थी गेले कुठे? याचा शोध घेण्यासाठी शिक्षक गावातही गेले. मात्र, सदर विद्यार्थी गावातच नव्हते. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर हा प्रकार पुढे आला. भातकुली, अमरावती येथील काही आश्रमशाळांच्या व्यवस्थापकांनी पालकांकडून लिहून घेतल्याचे सांगण्यात आले.
आरटीई कायद्याचा गैरवापर
नवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून राकेश बाबुलाल बेठेकर, अस्मिता बन्सीलाल सेलूकर, राजश्री रामदास धिकार, विकेश महादेव बेठेकर, ईश्वर राजू बेठेकर, साहित महादेव बेठेकर, सपना बाबनू बेठेकर, करीना सोनेकलाल बेठेकर, आकाश नंदराम बेठेकर आणि शोभाली दयाराम भुसूम अशी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अमरावती व भातकुली येथील संस्थाचालकांनी शाळेतून कुठल्याच प्रकारचा शाळा सोडल्याचा दाखला टीसी न घेता तसेच घेऊन गेले. त्यामुळे विद्यार्थी कुठे गेले याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना शोधमोहीम राबवावी लागली. आरटीई कायद्यानुसार वयाचा दाखला असला तर (टीसी)ची गरज भासत नसल्याचा कायदा आहे. त्याचाच गैरफायदा खाजगी संस्थाचालक अनुदान लाटण्यासाठी घेत असल्याचे यावरून उघडकीस येत आहे.
पैशांचे आमिष देऊन पळवितात विद्यार्थी
मेळघाटातील भोळाभाबड्या आदिवासींना शहरी भागातील आश्रमशाळांचे संस्थाचालक पैशांचे आमिष देऊन त्यांना पळवून नेत असल्याचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात आहे. शासन निर्णयानुसार एका प्रकल्पातून ३० किलोमीटरपेक्षा अधिक दूर असलेल्या दुसऱ्या शाळेत विद्यार्थ्याला नेता येत नाही. तरीसुद्धा काही संस्थाचालक राजकीय अभयाने मेळघाटातील शाळांमधील विद्यार्थी पळविण्याचा घाट रचत आहेत.
गतवर्षी बंद पडली बिच्छूखेड्याची शाळा
चिखलदरा तालुक्यातील बिच्छूखेडा येथील जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थीच मिळत नसल्याने बंद करण्यात आली.
नवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची टीसी नेतात. काही खासगी शाळांमधील संस्थाचालक आदिवासींच्या भोळेपणाचा फायदा घेतात. यासंदर्भात शिक्षणाधिकारी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणार आहेत.
- संदीप बोडखे, गटशिक्षणाधिकारी चिखलदरा