धक्कादायक; तीन रुपयांचा कर घेऊन दिला घटस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:47 PM2019-08-03T12:47:08+5:302019-08-03T12:49:45+5:30
अक्कलकोट तालुक्यातील सांगवी गावातील घटना; तिसºयांदा संसार मोडणाºया जात पंचायतीविरुद्ध शोषित महिलेने घेतली अखेर पोलिसांकडे धाव !
सोलापूर : नवºयाशी घटस्फोट (सोडचिठ्ठी) करू नका असा टाहो फोडणाºया महिलेचे गाºहाणे न ऐकता गोसावी समाजाच्या जात पंचायतीने तिसºयांदा हाच प्रकार केला. यापूर्वीही जात पंचायतीने या शोषित महिलेला जबरदस्तीने दोनदा घटस्फोट देऊन अन्याय केला होता. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या गावातील ही घटना असून, या महिलेने आता पोलिसांकडे धाव घेतली आहे.
सांगवी गावात गोसावी समाजाचे प्राबल्य आहे. जात पंचायतीने सुनीता (बदललेले नाव) हिला तिची मागणी नसताना यापूर्वीच दोनदा घटस्फोट क रुन दिला. काही काळानंतर गोसावी समाजातील एका तरुणासोबत तिचे प्रेम झाले. या प्रेमप्रकरणातून सुनीता हिने त्या तरुणाशी विवाह केला. हा विवाह जात पंचायतीने लावून दिला. या विवाहानंतर सुनीता हिला तीन महिन्याचे मुलदेखील आहे. असे असतानाही सुनीताच्या नवºयाने तिला घटस्फोट देण्यासाठी तगादा लावला; मात्र सुनीताने नकार दिल्यानंतर त्याने जात पंचायतीकडे धाव घेतली.
सुनीताला कल्पना न देता परस्पर जात पंचायतीने घटस्फोट झाल्याचा निर्णय दिला. सुनीताने याची विचारणा केल्यानंतर जात पंचायतीची प्रथा व परंपरा अनुसार आम्हाला अधिकार असल्याचे जात पंचायतीच्या प्रमुखाने सांगितले. घटस्फोट देऊ नका असे म्हणत जात पंचायतीसमोर सुनीताने वारंवार विनवण्या केल्या, पंचाचे पाय धरले, तरीदेखील जात पंचायतीने तिचे गाºहाणे न ऐकता तीन रुपयांचा कर घेऊन घटस्फोट झाल्याचे सांगितले.
महाराष्ट्र गोसावी समाजाच्या प्रमुखांनी या घटस्फोटाला विरोध केला असतानादेखील सांगवी गावच्या जात पंचायतीने याची दखल घेतली नाही. जात पंचायतीच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात सुनीताने अक्कलकोट पोलीस ठाण्यात धाव घेतली; मात्र येथेही तिच्या पदरी निराशाच आली. यापूर्वी दोन लग्न झाले असताना आता तिसरा नवरा कशाला हवा असे म्हणत पोलिसांनी सुनीताचे म्हणणे धुडकावून लावले. २६ जुलै ते २९ जुलै दरम्यान सलग पोलीस ठाण्याच्या चकरा मारुनही पोलिसांनी तू नवºयाला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करत दम दिला असे सुनीताने सांगितले.
पोलीसही दखल घेत नसल्याचे पाहून सुनीताने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे कार्यालय गाठले. आपले गाºहाणे पोलीस अधीक्षकासमोर मांडले. पाटील यांनी जात पंचायतीतील पंचांवर कारवाई करण्याचे आदेश अक्कलकोट पोलिसांना दिले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेताना भटक्या व विमुक्त जाती संघाचे अध्यक्ष मच्ंिछद्र भोसले, सचिव अविनाश रेणके, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जाधव, रिपब्लिकन पक्षाचे उत्तर सोलापूर युवक अध्यक्ष विशाल कांबळे हे उपस्थित होते.
सांगवी गावात अशी अनेक उदाहरणे
- अक्कलकोट तालुक्यातील सांगवी गावात असे अनेक प्रकार घडले आहेत. जात पंचायतीने एका मुलीचे दोनदा, तीनदा लग्न लावून दिले. तसेच घटस्फोटही घेऊन दिले आहेत. महाराष्ट्र गोसावी समाजाच्या अध्यक्षांनी सुनीताबाबत झालेला निर्णय चुकीचे असल्याचे सांगितल्यावरही त्यांचे म्हणणे जात पंचायतीने ऐकले नाही, असे सुनीताने दिलेल्या निवेदनात नमूद केले.
ज्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे, तो तरुण शिक्षित आहे. पोलीस भरतीसाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याच्या करिअरला अडचणी येऊ शकतात हे त्याच्या लक्षात आले आहे. पाच लाखांची मागणी करण्यात आली.
- आप्पा जाधव,
पंच, गोसावी समाज.
गुन्हा दाखल करावा यासाठी शोषित महिला आमच्याकडे आली होती. तिच्याकडे लग्न झाल्याचा पुरावा नव्हता. तिला एक मूल असून त्याच्या जन्माचा दाखला महापालिकेतून आणून देण्यास आम्ही सांगितले. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आम्ही गुन्हा दाखल करुन घेणार आहोत.
- कल्लपा पुजारी, पोलीस निरीक्षक, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे.
अन्यायकारक पद्धतीने निकाल देणाºया जात पंचायतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. जात पंचायतीने अशा पद्धतीने निकाल देऊन अनेक मुलींना संसारातून उठवले आहे. लग्न लावायला तसेच घटस्फोट देण्यासाठी ते पैसे घेतात.
- बाळकृष्ण जाधव, जिल्हाध्यक्ष, भटक्या व विमुक्त जाती संघ