धक्कादायक! आंबेगाव तालुक्यात उसाच्या शेतात बिबट्याची पाच बछडे जळून मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 04:30 PM2019-04-03T16:30:39+5:302019-04-03T17:09:27+5:30
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, परिसरात ऊस तोडणी अंतिम टप्प्यात असून ऊस तोडणीसाठी शेतात असलेला पालापाचोळ्याला आग लावली जाते.
आंबेगाव : अवसरी बुदु्रुक (ता आंबेगाव) येथे उसाच्या शेतात बिबट्याची पाच पिल्ले जळून मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण परिसरात बिबट्याच्या बछड्यांच्या आगीत जळुन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, परिसरात ऊस तोडणी अंतिम टप्प्यात असून ऊस तोडणीसाठी शेतात असलेला पालापाचोळ्याला आग लावली जाते. अशाच एका घटनेत अवसरी बुद्रुक येथील गोपीनाथ सखाराम गुणगे यांच्या शेतात आज सकाळच्या सुमारास ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी आले असताना काही ठिकाणी उसाच्या शेतातील पालपाचोळ्याला आग लावली. दरम्यान या उसाच्या पाचुट जळत असताना बिबट मादीची पाच पिल्ले दडून बसली होती. आगीच्या दाहाने बिबट्या मादी समोरील उसाच्या शेतात पळून गेल्याचे ऊस तोडणी कामगारांनी पाहिले. परंतु, बिबट्याची पिल्ले छोटी असल्याने या बिबट्यांच्या पिल्लांनाचा आगीत जळून मृत्यू झाला आहे.
बिबट्या मादीची चिमुकली पिल्ले आगीत जळुन मृत्यु झाल्याने या परिसरात असणारी बिबट्या मादी क्रोधित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे या परिसरात नागरिकांनी पुढील काळात सतर्क राहण्याची गरज आहे. ऊस शेतीला जंगल समजून बिबट्या उसाच्या शेतात वास्तव्य करत असताना बिबट्या मादीची पिल्लेही ऊस शेतीचा आधार घेऊन वास्तव्य करत असताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
बिबट्याच्या व बछड्यांच्या संगोपनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वनविभाग या घटनेकडे कशा पद्धतीने पाहणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या घटनेचे माहिती प्रशांत वाडेकर यांनी तात्काळ अवसरी वनपाल एस. पी. शिंदे यांना तात्काळ माहिती कळविली,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे,मंचर वनपाल व्ही. आर. वेलकर,अवसरी वनपाल एस. पी. शिंदे,पोलीस पाटील माधुरी शिंदे यांनी पंचनामा केला.
अवसरीचे उपसरपंच सचिन हिंगे यांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली असून बिबट्याची मादी ही पिलांच्या शोकात चवताळून या परिसरातील नागरिकांवर हल्ला करू शकते.