धक्कादायक; उन्हाच्या तीव्रतेमुळे राज्यात ६,५०० एकर तुतीचे क्षेत्र घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 09:53 AM2020-01-29T09:53:57+5:302020-01-29T09:56:05+5:30
टिकून राहिलेल्या क्षेत्रातील रेशीमकोषाला येतोय चांगला भाव; तुतीच्या क्षेत्रात सर्वाधिक फटका औरंगाबाद विभागाला
अरुण बारसकर
सोलापूर : मागील वर्षीच्या दुष्काळाच्या तीव्रतेमुळे राज्यभरातील ६ हजार ५०० एकर क्षेत्र घटले आहे, त्यात औरंगाबाद विभागातील चार हजार हेक्टरला फटका बसला होता. टिकून राहिलेल्या क्षेत्रातील रेशीमकोषाला चांगला दर मिळत असून, तो प्रति किलो ५०० रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात मागील काही वर्षांत तुतीच्या लागवडीवर शासनाने भर दिला आहे. रेशीमकोषाला स्थानिक बाजारापेठा निर्माण होण्यासाठीही राज्य शासनाने प्रयत्न केल्याने तुतीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. तुती लागवडीचा मनरेगामध्ये समावेश केल्याने लागवडीपासून सलग तीन वर्षे दोन लाख ९५ हजार रुपये अनुदान स्वरूपात शेतकºयांना मिळतात. शिवाय कमी पाण्यावर येणारे हे पीक आहे. यामुळे प्रामुख्याने औरंगाबाद, अमरावती, नागपूर व पुणे विभागात मोठ्या प्रमाणावर तुतीची लागवड झाली होती.
तुतीचे क्षेत्र २३ हजार ५०० एकर इतके झाले होते. मात्र मागील वर्षी दुष्काळाची प्रचंड दाहकता असल्याने तुतीच्या क्षेत्रावर मोठी घट झाली आहे. राज्यातील जवळपास ६ हजार ५०० एकर क्षेत्र जळाले होते. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील चार हजार एकर, पुणे विभागातील एक हजार एकर, अमरावती विभागातील ११०० एकर तर नागपूर व अन्य एक अशा दोन जिल्ह्यांतील ४०० एकर क्षेत्र कमी झाले आहे.
सध्या राज्यात १७ हजार एकर तुतीचे क्षेत्र असून, या टिकून राहिलेल्या क्षेत्रातील रेशीमकोषाला चांगला दर मिळत आहे. मागील वर्षी प्रतिकिलो ३०० ते ३५० रुपयांपर्यंत रेशीमकोषाची विक्री झाली होती. यावर्षी मात्र त्याच रेशीमकोषचा दर ४०० ते ५०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. चांगला पैसा मिळू लागल्याने शिवाय बाजारपेठही जवळच उपलब्ध झाल्याने शेतकºयांच्या हातात चार पैसे राहू लागले आहेत.
बारामती, जालना व पूर्णा येथे रेशीमकोष खरेदी केंद्र
- - यंदा राज्यात बारामती, जालना व पूर्णा (अमरावती) येथे रेशीमकोष खरेदी केंद्र सुरू
- - कडक उन्हाळा, लांबलेला पाऊस, पावसाची संततधार व अनुदानाची तीन वर्षे संपल्याने क्षेत्र कमी झाल्याची कारणे
- - औरंगाबाद जिल्ह्यात ९०० एकर, जालना ७५० एकर, लातूर ५५० एकर, उस्मानाबाद ६५० एकर, परभणी ३७५ एकर, हिंगोली, बीड, यवतमाळ व बुलडाणा प्रत्येकी ३०० एकर, नागपूर २०० एकर क्षेत्रातील तुतीचे क्षेत्र कमी झाले.
- - तासगाव (सांगली) येथे रेशीमकोषासाठी दररोज दीड टन क्षमतेची स्वयंचलित रीलिंग मशीन पुढील महिन्यात सुरू होणार.
मनरेगामधून प्रति एकरी दोन लाख ९५ हजार रुपये अनुदान मिळते. शिवाय ट्रेनिंगची सोय. यावर्षी पाच हजार एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट तर १० हजार शेतकºयांची नोंदणी अपेक्षित आहे. महारेशीमचा फायदा शेतकºयांनी घ्यावा. मागील काही वर्षांत रेशीमकोषाचा दर कमी झालेला नाही. शिवाय राज्यातच कोष विक्रीची सोय केली.
- अर्जुन गोरे
उपसंचालक (रेशीम), नागपूर