धक्कादायक; व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून ‘त्याने’ घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:10 PM2019-05-16T12:10:01+5:302019-05-16T12:10:46+5:30
आपल्या मोबाईलवर आई-वडील माझे लाईफलाईन, दोन भाऊ माझे हृदय.. असा स्टेटस ठेवला आणि काही वेळाने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला.
संताजी शिंदे
सोलापूर : नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहणाºया आणि मित्रांमध्ये लाडका असणाºया नीलेश कुसेकर याने मंगळवारी दुपारी अचानक आपल्या मोबाईलवर आई-वडील माझे लाईफलाईन, दोन भाऊ माझे हृदय.. असा स्टेटस ठेवला आणि काही वेळाने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. नीलेशची एका तासात बदललेली मानसिकता व आईच्या मांडीवर घेतलेला शेवटचा विसावा, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण करीत आहे.
नीलेश ज्योतीराम कुसेकर (वय २५, रा. मजरेवाडी) याचे १२ वी (एमसीव्हीसी) पर्यंतचे शिक्षण झाले आहे. सध्या तो कन्स्ट्रक्शन क्षेत्रात सुपरवायझर म्हणून काम करीत होता. मोठा मित्र परिवार आणि हसता खेळता स्वभाव असलेला नीलेश सर्वांसाठी प्रिय होता. नीलेश याचे वडील रायचूर (कर्नाटक) येथे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतात. मोठे भाऊ सचिन सोलापुरात एका कंपनीत कामाला आहेत. दोन नंबर भाऊ नितीन पुणे येथे इंजिनिअर आहेत. तीन भाऊ व आई-वडिलांचा संसार सुरळीत सुरू होता. नितीन यांचे लग्न जमले असून, डिसेंबरमध्ये लग्न करण्याचे नियोजन सुरू होते.
गेल्याच महिन्यात १० एप्रिल रोजी नीलेश याचा २५ वा वाढदिवस त्याच्या मित्र कंपनीने मोठ्या थाटात साजरा केला होता. नीलेश नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता घराबाहेर पडला. दुपारी १२ वाजेपर्यंत तो मित्रांसमवेत होता. १२ नंतर तो एकटा कुठेतरी निघून गेला. १.१५ वाजता तो घरी आला. कधी नव्हे ते आई निर्मला यांच्या मांडीवर झोपला, माझे डोके खूप दुखत आहे, असे म्हणाला. आईने डोक्यावर हात फिरवल्यानंतर तो वरच्या मजल्यावरील स्वत:च्या खोलीत गेला.
नीलेश याने अचानक व्हॉट्सअॅपवर बदललेला स्टेटस पाहून भाऊ सचिन यांनी त्याला पावने दोन वाजता फोन केला, मात्र मोबाईल बंद लागत होता. पुन्हा ४ वाजता लावला तेव्हाही बंद लागला. सायंकाळी सव्वापाच वाजता सचिन घरी आले तेव्हा त्यांनी नीलेश याची चौकशी केली. मोबाईल लागत नसल्याने सचिन भिंतीवरून चढून वरच्या मजल्यावर गेले. आतून लावलेले जिन्याचे दार काढले. आई निर्मला या देखील वर आल्या. दरवाजा वाजवला, मात्र आतून काहीच प्रतिक्रिया येत नव्हती. शेवटी सचिन यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा नीलेश दोरीच्या साह्याने गळफास घेऊन लटकत होता. हा प्रकार पाहून आई जागेवर कोसळून बेशुद्ध झाली. सचिन यांनी त्याला खाली उतरवून थेट शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
मोबाईलमधील डाटा केला डिलिट...
- नीलेश याने गळफास घेण्यापूर्वी स्वत:च्या मोबाईलमधील फोटो, फोन नंबर, मेसेज, व्हॉट्सअॅपचे मॅसेज सर्व काही फॉरमॅट मारले होते. त्यामुळे त्याने शेवटचा फोन कोणाला केला, काय मॅसेज होते याची काही माहिती मिळत नाही. दररोज हसत खेळत राहणाºया नीलेशने असा अचानक निर्णय कसा घेतला आणि अवघ्या एका तासात काय झाले असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.