भाजपात धक्कादायक नावे!

By admin | Published: October 23, 2016 01:45 AM2016-10-23T01:45:56+5:302016-10-23T01:45:56+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी उमेदवार म्हणून काही धक्कादायक नावे समोर येत आहेत. भंडारा-गोंदियामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र

Shocking names in the BJP! | भाजपात धक्कादायक नावे!

भाजपात धक्कादायक नावे!

Next

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी उमेदवार म्हणून काही धक्कादायक नावे समोर येत आहेत. भंडारा-गोंदियामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आणि नागपूरचे नगरसेवक परिणय फुके यांचे नाव जवळपास पक्के झाले आहे.
भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन विद्यमान आमदार असून ते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती आहेत. फुके यांच्या उमेदवारीने तेथील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. यवतमाळमध्ये नाईक घराण्यातील असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नीलय नाईक यांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात असून पक्षाने तशी चाचपणीदेखील केली आहे. नाईक यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची बरीच मते फोडता येतील, असा तर्क त्यासाठी दिला जात आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात बापू भेगडे आणि
माजी आमदार विलास लांडे यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्याचा भाजपाचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भेगडे हे गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढले आणि पराभूत झाले होते. विलास लांडे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली होती आणि ते पराभूत झाले होते.
मतदारसंख्येचा विचार केला तर पुणे मतदारसंघात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. अशावेळी राष्ट्रवादीची तसेच अपक्ष मते खेचू शकणाऱ्या उमेदवाराचा शोध भाजपा घेत असून त्यातूनच भेगडे आणि लांडे यांची नावे समोर आली आहेत.
जळगावमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक आणि विद्यमान आमदार गुरुमुख जगवानी यांना पुन्हा संधी दिली जाईल, असे चित्र आहे. मात्र, त्यांना पक्षांतर्गत मोठा विरोध असल्याचे बोलले जाते. या शिवाय, शिवसेनेची भूमिकाही महत्त्वाची असेल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Shocking names in the BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.