धक्कादायक..! दर मिनिटाला संगणकावर एकोणीसशे व्हायरस हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 07:00 AM2019-05-17T07:00:00+5:302019-05-17T07:00:05+5:30
ग्राहकांची वैयक्तिक माहिती, बँकेची माहिती, खासगीपणा, आठवणी अशा अनेक गोष्टी सायबर हल्लेखोरांकडून लक्ष्य केल्या जात आहेत.
पुणे : गेल्या वर्षी डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर तब्बल ९७ कोटी ३० लाख 'मालवेअर' धोके शोधण्यात आले. त्यातील तब्बल २३ टक्के हल्ले हे सायबर दरोडेखोरांकडून (रॅन्समवेअर) करण्यात आले असल्याची माहिती मालवेअर तज्ज्ञ आणि क्विक हीलचे व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर यांनी गुरुवारी येथे दिली. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात जसजशी वाढ होत आहे, त्या प्रमाणात सायबर हल्लेखोरांकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यातही वेगाने वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायबर हल्ल्यांपासून सुरक्षा देणाऱ्या क्विक हील कंपनीच्या उत्पादनाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. क्विक हीलचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर या वेळी उपस्थित होते. ग्राहकांची वैयक्तिक माहिती, बँकेची माहिती, खासगीपणा, आठवणी अशा अनेक गोष्टी सायबर हल्लेखोरांकडून लक्ष्य केल्या जात आहेत. शहरातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यात तब्बल ९४ कोटी रुपये बँकेतून लुटून नेले होते. देशातील हा सर्वात मोठा हल्ला ठरला होता. तसेच, रॅन्समवेअर, वेबकॅम, वेब सिक्युरिटीचे प्रश्न देखील ऐरणीवर आले आहेत. लॅपटॉपसह मोबाईल देखील संगणाक झाला असल्याने त्यातील धोक्यांमध्ये वाढ झाली आहे.
उपकरणाची मेमरी कमीत कमी खर्च करणाऱ्या आणि आणि प्रोसेसरवरील डिस्क साठवणीच्या क्षमतेवरील भार कमी करणाऱ्या उपकरणाची आवश्यकता भासू लागली आहे. त्यासाठी जलदगतीने सुरक्षेची झाडाझडती घेणे प्रसंगी उपकरण बंद होण्याचा कालावधी सुधारणे अशा वैशिष्ट्यांचे उत्पादन बाजारात आणले असल्याचे काटकर म्हणाले.
गेल्यावर्षी (२०१८) डेस्कटॉप आणि लॅपटॉप्सवर ९७ कोटी ३० लाख मालवेअर धोके उघड झाले आहेत. यात रॅन्समवेअर, क्रिप्टो-मायनर्स आणि बँकिंग ट्रोजनसारखे धोके गंभीर झाले आहेत. यात सिग्नेचर आधारित सुरक्षा प्रणाली भेदून, संगणक प्रणालीवर हल्ला करण्याची क्षमता देखील हल्लेखोरांकडे आहे. त्यामुळे वापरकर्त्यांची माहिती अधिक सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचेही काटकर म्हणाले.
------------
काय आहे रॅन्समवेअर ?
हल्लेखोर एखाद्या कंपनीच्या संगणक प्रणालीवर हल्ला करुन, कंपनीची महत्त्वाची माहिती गोठवून (ब्लॉक) टाकतात. माहिती गोठविल्यानंतर कंपनीच्या संगणकावर खंडणीच्या रक्कमेचा मेसेजही येतो. संबंधित कंपनीने खंडणीची रक्कम दिल्यानंतरच, त्यांची माहिती कंपनीसाठी खुली केली जाते. त्याला रॅन्समवेअर म्हटले जाते.