धक्कादायक वास्तव : गेल्या अडीच वर्षांत १८ वाघांची शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:13 AM2019-09-30T05:13:35+5:302019-09-30T05:14:01+5:30
जय वाघ व अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण तापले असतानाच २०१७ पासून ३१ महिन्यांत राज्यात १८ वाघांची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे विदर्भातील आहे.
नागपूर : जय वाघ व अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण तापले असतानाच २०१७ पासून ३१ महिन्यांत राज्यात १८ वाघांची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे विदर्भातील आहे.
अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. राज्यात किती वाघांचा मृत्यू झाला, यातील शिकारीची प्रकरणे किती होती, आरोपींविरोधात काय कारवाई झाली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत महाराष्ट्रातील १८ वाघांची चक्क शिकार करण्यात आली. यात दहा वाघ, सहा वाघिणी तर दोन बछड्यांचा समावेश होता. २०१७ साली ९, २०१८ मध्ये ३ व २०१९ मध्ये ६ वाघांची शिकार झाली. आठ वाघांना विद्युत प्रवाहाद्वारे, आठ वाघांना विषप्रयोग करून मारण्यात आले, तर दोघांची प्रत्यक्ष शिकार करण्यात आली.
नागपूर वनक्षेत्रात सर्वाधिक आठ शिकारी
या घटना नागपूर, चंद्रपूर, अमरावती किंवा गडचिरोली वनक्षेत्रातच झाल्या आहेत. सर्वात जास्त आठ शिकारी नागपूर वनक्षेत्रात झाल्या. आठ वाघांची शिकार चंद्रपूर वनक्षेत्रात झाली. प्रत्येकी एका वाघाची शिकार गडचिरोली व अमरावती वनक्षेत्रात झाली.