धक्कादायक वास्तव; वऱ्हाडात दहा महिन्यांत ९२८ शेतकरी आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 05:50 PM2018-11-06T17:50:58+5:302018-11-06T17:51:35+5:30
अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतक-यांना सावरण्यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी शर्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही.
अमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतक-यांना सावरण्यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी शर्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. शेतक-यांच्या संघर्षावर नैराष्य भारी पडत आहे. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात यंदा आॅक्टोबर महिन्यापर्यंत ९२८ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला. दर दिवशी तीन शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मुलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगावं कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात आॅक्टोबर २०१८ पर्यंत १५ हजार ६२९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये सात हजार ८ प्रकरणे पात्र, आठ हजार ४०६ अपात्र, तर २१५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्देवी आहे. २००१ मध्ये ५२ प्रकरणे होती. २०१६ मध्ये १२३५, तर गतवर्षी ११७६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. यंदा जानेवारी महिन्यात ९८, फेब्रुवारी ८४, मार्च ९६, एप्रिल ७८, मे ८४, जून ८६, जुलै ८९, आॅगस्ट १०६, सप्टेंबर १०४ व आॅक्टोबर महिन्यात १०३ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.
१७ वर्षांत १५,६२९ शेतकरी आत्महत्या
गेल्या १७ वर्षांत विभागासह वर्धा जिल्ह्यात १५,६२९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये अमरावती विभागात १३ हजार ९९८ शेतकºयांनी मृत्यूचा फास जवळ केला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३,५२५, अकोला २,१९९, यवतमाळ ४,१५९, बुलडाणा २,६४०, वाशिम १,४७५ व वर्धा जिल्ह्यात १,६३१ शेतक-यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.
शेतकरी स्वावलंबी मिशन कुचकामी
राज्यात शेतकरी आत्महत्याप्रवण असणा-या १४ जिल्ह्यांसाठी आघाडी सरकारने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशनला गती यावी, यासाठी २४ आॅगस्ट २०१५ रोजी पुनर्रचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र, शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यास या मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे.