मंत्रिमंडळ विस्तारात धक्कादायक फेरबदल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:39 AM2018-10-18T05:39:16+5:302018-10-18T05:40:08+5:30
खडसेंना प्रदेशाध्यक्षपदही नाही; ज्येष्ठ मंत्र्यांवर पक्षकार्याची जबाबदारी
मुंबई : राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून हा फेरबदल धक्कादायक असेल आणि त्याचा फटका काही दिग्गजांनादेखील बसू शकतो, अशी माहिती आहे.
फेरबदल कधी होणार या बाबत वेगवेगळ्या तारखा माध्यमांमधून येत असून आता २२ किंवा २३ आॅक्टोबरला फेरबदल होईल, असे म्हटले जात आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याबाबत कोणताही विचार पक्षात सुरू नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, येत्या वर्षभरात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदोन ज्येष्ठ मंत्र्यांना वगळून पक्ष कार्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याला लोकसभेच्या मैदानात उतरविले जाऊ शकते. धक्कादायक बदलांचे मुख्य केंद्र हे मुंबई असू शकेल. किमान दोन ते तीन मंत्र्यांकडील एकेक खाते काढून नवीन मंत्र्यांना दिले जाईल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरबदलाबाबत काल मुंबईत चर्चा केल्याचे समजते.
फडणवींसाचा प्रभाव
लोकसभा निवडणुकीला सहा महिने तर विधानसभा निवडणुकीला १३ महिने बाकी असताना मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असेल आणि मुख्यमंत्र्यांच्या नजीकचे असलेले काही चेहरे मंत्री म्हणून दिसतील.
तसेच कुणबी, माळी या समाजांना पहिल्यांदाच स्थान दिले जाईल. विभागीय संतुलनासह जातीय संतुलनावरही भर दिला जाईल, असे मानले जाते.