CoronaVirus: धक्कादायक! कोरोनानंतर गुलियन व्हायरसची लागण; सातारच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 04:11 PM2021-06-11T16:11:22+5:302021-06-11T16:13:06+5:30
gulian barey syndrome Virus after corona: गुलियन बेर्री सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने सध्या डोके वर काढले आहे. हवेवाटे अज्ञात व्हायरस शरीरात घुसतो. दीड दिवस ते दोन आठवड्यांत तो संपूर्ण शरीरात पसरून अंतर्गत अवयवांवर हल्ला चढवतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : आसू (ता. फलटण) येथे एका तरुणाचा गुलियन बेरी सिंड्रोम (gulian barey syndrome) व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी या युवकाला कोरोना झाला होता. जीबीएस (GBS) व्हायरसमुळे मृत्यू होण्याची ही घटना पहिलीच असून, आरोग्य यंत्रणेसह या घटनेमुळे सर्वच जण चक्रावून गेले आहेत. (Satara patient died in GBS virus after recover corona virus)
आसू (ता. फलटण) येथील शिवराज स्वामीनाथ साबळे (वय १८) याला सुमारे एक महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. त्याचा एचआरसीटी केवळ दोन होता. या आजारातून तो पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर दोन दिवसांनी त्याला अशक्तपणा जाणवून प्रकृती खालावत गेली. पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला जीबीएस व्हायरस झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. शिवराजचे वडील स्वामीनाथ साबळे हे श्रीराम सहकारी .साखर कारखान्याचे संचालक आहेत.
जीबीएसची लक्षणे...(GBS symptoms)
गुलियन बेर्री सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने सध्या डोके वर काढले आहे. हा अज्ञात व्हायरस शरीरात घुसून थेट रक्तवाहिनी, स्नायूवर हल्ला करत असल्याने हाता-पायातील ताकद जाऊन अंग लुळे पडण्याची लक्षणे असणारे अनेक रुग्ण आढळले आहेत. योग्य औषधोपचाराने हा रोग काबूत येत असला तरी, खर्चिक उपचारामुळे रुग्णाचे नातेवाईक मेटाकुटीस येत आहेत.
या आजाराबाबत अधिक माहिती देताना तालुका वैद्यकीय अधिकारी विक्रांत पोटे म्हणाले, जीबीएस आजार जुना असला तरी, पावसाळ्यात जास्त बळावत आहे. हवेवाटे अज्ञात व्हायरस शरीरात घुसतो. दीड दिवस ते दोन आठवड्यांत तो संपूर्ण शरीरात पसरून अंतर्गत अवयवांवर हल्ला चढवतो. यामुळे स्नायू व रक्तवाहिन्यांची ताकद कमी झाल्याने रुग्ण हालचाल व चालण्याची क्षमता गमावून बसतो. त्यानंतर मानेचे स्नायू व श्वसननलिकेवर हल्ला केल्याने रुग्णाची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते.
गेल्या महिनाभरात अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये जीबीएसचे रुग्ण दाखल झाले. या रोगाचे निदान वेगाने होण्याची गरज असते. मेंदूचे स्कॅनिंग झाल्यावर संबंधिताला अर्धांगवायू नसल्याचे निदान होते. नंतर रक्ततपासणी, नसांचे स्कॅनिंग, कमरेतील पाण्याचे रिपोर्ट घेऊन
जीबीएसचे निदान केल्यानंतर ताबडतोब उपचार सुरू केले जातात. जीबीएसचा रुग्ण बरा होऊ शकतो. पण, त्याचे उपचार खर्चिक आहेत. रुग्णाला इमिओग्लोब्युलेंटची इंजेक्शन्स द्यावी लागतात. रुग्णाच्या श्वासनलिकेवर व्हायरसचा हल्ला झाल्यास श्वसनाला त्रास होत असल्याने रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात येते. इंजेक्शनऐवजी प्लाइमा सेरेसिसद्वारे उपचार केले जातात. या उपचार पद्धतीत रुग्णावर डायलेसिसचे चार ते पाच वेळा उपचार करून रक्तात'
मिसळलेला व्हायरस काढून टाकला जातो. औषधोपचाराने रुग्ण बरा होतो, असे डॉक्टरांनी सांगितले. शहरातील अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये जीबीएसचे रुग्ण आहेत. या आजाराची लक्षणे म्हणजे रुग्णाचे अंग दुखू लागते. चालताना तोल ढळतो. चेहरा सुजतो. गिळताना त्रास होतो. हात व पाय लुळे पडतात. हा रोग जुना असून पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला होतो. एक लाख लोकांमध्ये तीन ते चार व्यक्तींना याची बाधा होते. योग्य व वेळेत उपचार केल्यावर रोगी पूर्णपणे बरा होतो.