धक्कादायक प्रकार! खचलेल्या मनांना धीर देणारे हात नसल्याने तिघांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 01:58 AM2020-10-14T01:58:14+5:302020-10-14T06:51:22+5:30
बोराळा गावास सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, गावात तरूणांची संख्या लक्षणीय दिसली़ शवविच्छेदन अहवालातील तिघांचे कारण समान आहे़
चंद्रकांत देवणे
वसमत (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील बोराळा गावात सलग तीन दिवसांत तीन आत्महत्या झाल्याने समाजमन हादरून गेले आहे़ या आत्महत्यांना अतिवृष्टी, नापिकी हे मुख्य कारण आहेच, सोबतच सततच्या संकटाच्या मालिकेने खचलेल्यांना धीर, हिंमत देणारे हात नसल्याने व संकट कोणासमोर न सांगण्याची वृत्ती या कारणांची झालर असल्याचेही समोर येत आहे़ या घटनेनंतर आ़ राजू पाटील नवघरे यांनी मंगळवारी या गावात ग्रामसभा घेत गावच दत्तक घेतल्याची घोषणा केली़
बोराळा गावास सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, गावात तरूणांची संख्या लक्षणीय दिसली़ शवविच्छेदन अहवालातील तिघांचे कारण समान आहे़ वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांची आत्महत्या म्हणून तर एका प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची नोंद आहे. ९ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेल्या प्रभाकर जाधव (३२) याच्या घरी मंंगळवारी भेट दिली असता वडील प्रल्हादराव जाधव व नातेवाईक भेटले. त्याच्या वडिलांनी सांगितले की, प्रभाकरच घरचा कर्ता कारभारी होता. अतिवृष्टी, नापिकीमुळे तो वैतागला होता़ सततच्या मानसिक दडपणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. १० ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेल्या संतोष खराटे (२२) याने शेतीच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलले. तसेच राजू गंगातीरे याने ७ ऑक्टोबर रोजीच आत्महत्येचा प्रयत्न केला, पण त्यास ग्रामस्थांनी वाचवले. मात्र त्याने पाचव्या दिवशी आत्महत्या केली़ या तिन्ही प्रकरणात तरुणांनी संकटाचा दबाव असह्य झाल्यानेच टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसले. वेळीच धीर देणारे समर्थ हात समोर आले असते तर कदाचित हे प्रकार टळले असते.