धक्कादायक! मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून तरूणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 06:24 PM2018-02-08T18:24:20+5:302018-02-08T22:17:54+5:30
मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या केली आहे. आज गुरूवारी (दि.8) संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास हर्षल सुरेश रावते या तरूणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याला गंभीर प्रकृती असताना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मुंबई : मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या केली आहे. आज गुरूवारी (दि.8) संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून या तरूणाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याला गंभीर प्रकृती असताना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हर्षल सुरेश रावते असं या तरूणाचं नाव असून तो मुळचा मुंबईतील चेंबुरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मंत्रालयात गृह विभागात कामासाठी हर्षल रावते आला होता अशी माहिती आहे. त्याच्यावर मुंबईच्या सेंट जॉर्ज रूग्णालयात उपचार सुरू होते. त्याने आत्महत्या का केली याबाबत अजून नेमकी माहिती मिळालेली नाही. दरम्यान, शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले होते त्यानंतर ही आणखी एक घटना घडली आहे.
दुसरीकडे,सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल रावते मेव्हणीच्या हत्येप्रकरणी 302 च्या कलमाअंतर्गत 2014 सालापासून औरंगाबादमधील पैठण ओपन जेलमध्ये शिक्षा भोगत होता. 30 दिवसांच्या पेरोलवर तो तुरूंगाबाहेर होता आणि आज त्याच्या पेरोलचा शेवटचा दिवस होता अशी माहिती आहे.
हर्षलच्या खिशामध्ये एक चिठ्ठीही सापडली असून, त्यामध्ये 'माय न्यायाधीश' अशा नावाने अर्ज लिहिला आहे. कारागृहातील कालावधीबद्दल हर्षल निराश होता. न्याय मिळत नसल्याची त्याची खंत होती. मंत्रालयात येऊन संबंधित विभागातील लोकांना भेटून, न्याय मिळेल अशी हर्षलला अपेक्षा होती.
काय आहे प्रकरण -
नाव : हर्षल सुरेश रावते
पत्ता : चेंबूर गावठाण, मुंबई
घटनेची माहिती : हर्षल हा आपली पत्नी सरितासोबत राहत होता. बँकेतील अधिकार्यांसोबत आपली ओळख असून, साळी सुवर्णा कदम हिला नोकरी लावून देतो म्हणून त्याने 85,000 हजार रूपये घेतले. त्यानंतर त्याने बनावट नियुक्तीपत्र तयार करून ते कुरियरमार्फत साळीला पाठविले. ते खोटे असल्याचे उघडकीस आले. सुवर्णा आता आपली बदनामी करेल, या भीतीने त्याने सुवर्णावर चाकूने 44 वार करीत तिची हत्या केली.
न्यायालय : या प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयात त्याला भादंवि 302 कलमान्वये जन्मठेप, 380 अन्वये 5 वर्ष कारावास अशी शिक्षा झाली आणि त्याची पैठण कारागृहात रवानगी करण्यात आली.
कारागृहात शिक्षा भोगत असताना सुद्धा त्याला एक वेळ शिक्षा झाली आहे.
गृहविभागाकडे प्रकरण :
- त्याने आतापर्यंत 12 वर्ष 6 महिने निव्वळ शिक्षा भोगली आहे.
- आतापर्यंत त्याने 6 वेळा संचित आणि 2 वेळा अभिवचन रजा उपभोगल्या आहेत.
- शासन निर्णयाप्रमाणे खूनाच्या गुन्ह्यात कूरता अधिक असेल किंवा गुन्हा महिला वा बालकांविरूद्ध असेल तर जन्मठेपेच्या शिक्षेत 26 वर्षांनंतर माफी देता येते.
- त्यामुळे या प्रकरणात आणखी 5 वर्ष त्याला कायद्याने माफी देता येणे शक्य नव्हते, असे गृहविभागाने सांगितले.