वाघाला मारण्यासाठी हैदराबादमधला नेमबाजीतला वाघ दाखल
By Admin | Published: June 28, 2017 05:47 PM2017-06-28T17:47:54+5:302017-06-28T18:03:19+5:30
पाच शार्पशूटर्स, ४० वनकर्मचारी व १२० मजुरांना यश न आल्याने अखेर भारतातील नेमबाजीत निष्णात असलेल्या हैदराबाद येथील शूटरला पाचारण करण्यात आले आहे.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
ब्रह्मपुरी, दि. 28 - तालुक्यात धूमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यात २४ जूनपासून जंगल पिंजून काढणाऱ्या पाच शार्पशूटर्स, ४० वनकर्मचारी व १२० मजुरांना यश न आल्याने अखेर भारतातील नेमबाजीत निष्णात असलेल्या हैदराबाद येथील शूटरला पाचारण करण्यात आले आहे. त्याने तीन दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्याचा संकल्प सोडला असल्यामुळे वाघ केव्हाही ठार मारला जाण्याची शक्यता बळावली आहे.
शपथआली नवाब असे या शुटरचे नाव आहे. देशात कुठेही वाघाचा बंदोबस्त करायचा असल्यास त्याला पाचारण करण्यात येत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. शपथआली बुधवारी हळदा परिसरात दाखल झाला. त्याने ‘मिशन टायगर’ सुरू करून जंगल परिसराचे भ्रमण सुरू केल्याची माहिती वनविभागाच्या सूत्राने ‘लोकमत’ला दिली. शपथआली हा नेमबाजीतला ‘वाघ’ असल्यामुळे त्याची आता खऱ्या वाघाशी झुंज होणार असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर, भूज, हळदा या परिसरात वाघाने धूमाकूळ घालून आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत पसरली. संतप्त गावकऱ्यांनी वाघाच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरून वनविभागाला चांगलेच वेठीस धरले. यावरून आ. विजय वडेट्टीवार यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षकांना घेराव घालत ठिय्या दिला. आणि वाघाच्या बंदोबस्तासाठीचा वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना आदेश हातात घेतल्यानंतरच आंदोलन मागे घेतले.
दुसऱ्यादिवसापासूनच आदेशानुसार वनविभागाने पोलीस विभागातील पाच शूटर्सना सोबत घेऊन जंगलात ‘मिशन टायगर’ आंरभले. मात्र त्यांना प्रत्येकवेळी वाघाने हुलकावणी दिली. एकदा वाघ विभागाच्या कर्मचा-यांवर वाघ चवताळला, तर एका शूटरवर हल्ला चढविण्याच्या बेतात असताना शूटर बंदूक टाकून पळून गेल्याचेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे वाघाला मारण्यात वनविभागाला रस नाही, असा आरोप गावकऱ्यांकडून पुन्हा सुरू झाला. नेमका वाघ टिपता आला नाही, तर पुन्हा वन्यजीवप्रेमींच्या विरोधाचा सामना करावा लागेल, या भीतीपोटी वनविभागही अतिशय जबाबदारीने वाघाची शहानिशा करायला लागला. मात्र गावकऱ्यांचा रोष कायम असल्यामुळे अखेर वनविभागाने नेमबाजीत तरबेज असलेल्या हैद्राबाद येथील शूटरला पाचारण केल्याचे सांगण्यात येत आहे.