ठाणे, डोंबिवलीमध्ये शाळांची दुकानदारी
By admin | Published: June 7, 2017 04:00 AM2017-06-07T04:00:02+5:302017-06-07T04:00:02+5:30
ठाण्यातील चरई येथील श्री मावळी मंडळ इंग्रजी शाळेमधील सुमार दर्जाच्या महागड्या युनिफॉर्मवरून सोमवारी पालकांनी राडा केला.
प्रज्ञा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाण्यातील चरई येथील श्री मावळी मंडळ इंग्रजी शाळेमधील सुमार दर्जाच्या महागड्या युनिफॉर्मवरून सोमवारी पालकांनी राडा केला. शालेय साहित्याची विक्री शाळांमध्ये करु नये, असे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश असतानाही ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील अनेक एसएससी बोर्डाच्या शाळा तसेच सीबीएसई, आयसीएसईच्या शाळा हे आदेश धाब्यावर बसवून अत्यंत महागड्या दरात निकृष्ट दर्जाचे युनिफॉर्म, शूज, पीटी युनिफॉर्म आदी साहित्य गळ््यात मारत आहेत. बाहेर उपलब्ध होणाऱ्या युनिफॉर्मपेक्षा कितीतरी अधिक दराने शैक्षणिक साहित्याची विक्री करून सुरु असलेल्या या लुटालुटीविरुद्ध बोलायला पालक धजावत नाहीत. आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान केली जाण्याची दहशत या शाळांनी पसरवली आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हेही या बड्या शाळांचे मिंधे असल्याने त्यांच्यावर ना कारवाई होते, ना त्यांच्याविरुद्ध कुणी आवाज उठवते.
ठाणे : विद्यार्थ्यांचा गणवेश आपल्याच शाळेतून घेण्याची सक्ती करुन त्याच्या नावाखाली ठाण्यातील उच्चभ्रू शाळांकडून पालकांची अक्षरश: लूट केली जात आहे. अव्वाच्या सव्वा पैसे आकारुन निकृष्ट दर्जाचे गणवेश विद्यार्थ्यांच्या माथी मारले जात आहेत. गणवेशाव्यतिरिक्त शूज, सॉक्स, बेल्ट, कॅप साठीही वेगवेगळे शुल्क काही शाळांकडून आकारले जाते. अशा उच्चभ्रू शाळांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने पालकांची सर्रास लूट सुरु आहे.
याबाबत पालकांच्या मनात तीव्र नाराजी असली तरी शाळेच्या विरोधात चकार काढू शकत नाहीत असे त्यांनी सांगितले. यात युरो इंटरनॅशनल स्कूल, श्री माँ बालनिकेतनसारख्या शाळांचा समावेश आहे, अशी तक्रार पालकांनी केली. श्री मावळी मंडळ इंग्रजी शाळेच्या लुटालुटीविरुद्ध पालकांनी एल्गार पुकारला असला तरी अन्य शाळांमध्ये अशीच किंवा त्यापेक्षा कितीतरी अधिक लुटमार सुरु आहे.
ठाण्यातील काही उच्चभ्रू शाळांमध्ये शालेय गणवेशाबरोबर स्पोर्टस युनिफॉर्म, पी.टी युनिफॉर्म घेणेही बंधनकारक केले जाते. नियमीत वापरण्यात येणाऱ्या गणवेशाचा दर्जा हा अत्यंत सुमार असतो. गणवेशामध्ये कॉटन न वापरता टेरिकॉटचे कापड वापरले जाते. त्यामुळे उन्हाळ््यात मुलांना त्रास होतो. कमी दर्जाचे गणवेश असल्याने दुसऱ्या महिन्यात त्या गणवेशाची शिलाई हमखास निघते. वर्षभर हे गणवेश टिकवणे कठीण असते. वारंवार गणवेशांना शिलाई करावी लागते. अर्धे वर्ष न संपते तोवर गणवेशाचे तीन तेरा वाजलेले असतात. त्यामुळे पुढच्यावर्षी नाईलाजाने नवीन गणवेश खरेदी करावा लागतो. एका मुलामागे दरवर्षी आठ हजार रुपये हमखास खर्च होतो. त्यातही शुज, सॉक्स, बेल्ट, कॅप हे देखील शाळेतून खरेदी करावे लागते. ज्यांना दोन पाल्य आहेत त्यांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसतो, अशी व्यथा पालकांनी सांगितली. वार्षिक स्नेहसंमेलनाची फी, स्नेहसंमेलनात लागणाऱ्या वेशभूषेची फी देखील पालकांकडूनच वसूल केली जाते. या वेशभूषांचा दर्जा इतका घाणेरडा असतो की रस्त्यावरचे कपडे त्यापेक्षा बरे, अशी प्रतिक्रिया एका पालकांनी दिली. तसेच, नियमीत होणाऱ्या परिक्षांव्यतिरिक्त या शाळा वर्षभर छोट्या छोट्या चाचण्या घेत असते. त्या प्रत्येक चाचण्यांचे आणि त्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांचे पैसे देखील पालकांना भरावे लागतात. त्या पुस्तकांमध्येही वेगवेगळे प्रकार असल्याने त्यानुसार पुस्तकांची किंमत पालकांना मोजावी लागते. स्टडी मटेरियल शाळेतूनच घेणे सक्तीचे असल्याने त्याच्या नावाखाली पालकांची चांगलीच लुबाडणूक सुरू आहे. मात्र पालक या लुटालुटीबद्दल अवाक्षर काढत नसल्याने आम्हाला देखील आवाज उठवता येत नसल्याचे काही अस्वस्थ पालकांनी सांगितले.
युरो इंटरनॅशनल स्कूल
स्पोर्टस युनिफॉर्म - एक जोड, पीटी युनिफॉर्म - दोन जोड
नियमित युनिफॉर्म - दोन जोड
एक शर्ट - ४५० रुपये, विद्यार्थिनींचा स्कर्ट - ७५० रुपये
स्कूल बेल्ट - १५० रुपये, स्कूल कॅप - १५० रुपये
शूज - ३५०० रुपये, सॉक्स (एक जोडी) - १५० रुपये
वार्षिक स्नेहसंमेलनासाठी लागणारी वेशभूषेचे शुल्क :
एक हजार ते दीड हजार रुपये
शाळेची फी उशीरा भरल्यास ५०० रुपये दंड
स्केटींग शूज - कमीत कमी ३५०० रुपये (त्यातही दोन प्रकार) सेफ्टी गार्डचे वेगळे पैसे, छोट्या चाचण्यांसाठी (आॅलम्पियाड टेस्ट) : १८० रुपये फी
या चाचण्यांसाठी प्रत्येक पुस्तक. (त्यातही तीन प्रकार)
बेसिक पुस्तक - १५० रुपये, अॅडव्हान्स पुस्तक - २०० रुपये
सुपर अॅडव्हान्स पुस्तक - ४०० ते ५०० रुपये.
श्री माँ बालनिकेतन, घोडबंदर रोड
गणवेश (दोन जोड्या ) : ११०० ते १२०० रुपये. यात बेल्ट आणि सॉक्सचे वेगळे पैसे. वार्षिक स्नेहसंमेलनासाठी वेगळी फी
छोट्या छोट्या चाचण्यांची फी : १०० ते ३०० रुपये. स्पोर्टस युनिफॉर्मचे वेगळे पैसे.
पुस्तक, वह्या या शाळेतूनच घेणे सक्तीचे असून त्याची वेगळी पी आकारली जाते. त्याव्यतिरिक्त महिन्याची फी.