दुकानदाराला मारहाणीने जमाव संतप्त
By admin | Published: October 16, 2014 09:50 PM2014-10-16T21:50:10+5:302014-10-16T22:52:48+5:30
कुडाळमधील वातावरण तंग : दोन जवानांना चोप, नागरिकांचे तीन तास आंदोलन
कुडाळ : कुडाळमध्ये निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या तामिळनाडू येथील एसआरपीएफ पथकातील सुमारे १५ ते १६ जणांनी कुडाळ बाजारपेठेतील एका पान स्टॉलधारक तसेच त्याच्या मुलासहीत इतर पाच ते सहा जणांना जबर मारहाण केली व दुकानही फोडले. कारण नसताना मारहाण केल्यामुळे कुडाळच्या नागरिकांनी एकत्र होत रस्त्यावर सुमारे दोन ते तीन तास आंदोलन केले. या आंदोलनात दोन एसआरपीएफच्या जवानांना चोप देण्यात आला. या प्रकरणामुळे दिवसभर वातावरण तंग होते.
कुडाळ एसटी स्थानकासमोरील बाजारपेठेमध्ये एजाज नाझी शेख यांचे पान स्टॉल तसेच जनरल स्टोअर्स केसीएन नावाचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी निवडणूक काळातील बंदोबस्तासाठी चेन्नई तामिळनाडू येथील एसआरपीएफ पथकातील सुनील कुमार राजबीर सिंह (वय २५, रा. तामिळनाडू) हा सहकारी हरिश याच्यासह पान खाण्यासाठी आला. यावेळी ते ड्युटीवर नव्हते. त्यांनी दुकानावरील एजाज शेख याच्याकडे पानाची मागणी केली. त्याने पान दिल्यानंतर लवंग देण्यास सांगितले.
मात्र, शेख याने लवंग नसल्याचे सांगितले. त्यांनी लवंग पाहिजेच असा आग्रह धरला. यावेळी तिथेच बसलेल्या एका व्यक्तीने लवंग पाहिजेच का? असे विचारले. दुकानदाराने न विचारता त्रयस्थ व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाने त्या जवानांना राग आला. त्यांनी या किरकोळ कारणावरुन त्या व्यक्तिस मारहाण केली. त्या व्यक्तिस मारहाण होत असल्याचे पाहून आजूबाजूच्या तीन चार दुकानदारांनी ही मारहाण सोडविली. या दुकानापासूनच काही अंतरावर असलेल्या एका हॉलमध्ये या जवानांची राहण्याची सोय केलेली होती. या दोन जवानांनी घडलेली घटना कॅम्पच्या ठिकाणी असलेल्या अन्य साथीदारांना दिली.
१५ ते १६ जवान मारायला आले
त्या दोन जवानांनी मारहाणीची घटना सांगताच चिडलेल्या त्यांच्या पथकातील अन्य १५ ते १६ जवानांनी त्या दुकानाकडे चाल केली. आणि आपल्या जवानांना मारहाण का केली, अशी विचारणा करत दुकानातील एजाज शेख याला मारहाण करण्यास सुरुवात केली. कारण नसताना इजाज शेख याला या जवानांनी मारले व त्याबरोबर त्या तिथे असलेल्या दोन ते तीन लोकांनाही जबर मारहाण केली. हे जवान उगाचच एजाज तसेच अन्य लोकांना मारहाण करतात, हे पाहून बाजूच्याच हॉटेलचे रामदास शिरसाट हे मारहाण थांबवायला आले. मात्र, त्यांनाही या जवानांनी हाताच्या ठोशांनी, बुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली. त्याचबरोबर आनंद शिरसाट व हरिश्चंद्र परब या दुकानदारांनाही मारहाण केली.
जवानांकडून नासधूस
मारहाण करून पुन्हा आपल्या कॅम्पकडे जाताना या जवानांनी आजूबाजूच्या तसेच दुकानदार तसेच लोकांना धमक्या दिल्या व हिम्मत असेल, तर या, आम्ही तुम्हालाही मारणार, अशाही धमक्या देत या जवानांनी या सर्वांना मारले तसेच शेख यांच्या दुकानाची मोडतोड केली. चॉकलेट बरण्या फोडल्या, अंड्यांचे ट्रे फोडून टाकले तसेच इतर साहित्याची तोडफोड केली. या मारहाणीमध्ये रामदास शिरसाट, एजाज शेख, त्याचे वडील नाजू शेख, आनंद शिरसाट व हरिश्चंद्र परब तसेच इतर काहीजणांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. गंभीर दुखापत झाल्यामुळे ग्रामस्थांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, काही जखमींनी पुढे पोलिसांचा त्रास नको, यासाठी या घटनेपासून दूर राहणे पसंत केले.
दोघांना चोपले
घटना समजताच कुडाळवासीयांनी त्याचवेळी काही वेळाने तेथून जाणाऱ्या दोन जवानांना घेराओ घालीत मारहाण केली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांची सुटका केली. कारण नसताना तसेच ड्युटीवर नसताना दारूच्या नशेत या जवानांनी मुलांना मारहाण केली. या गोष्टीचा निषेध करीत असून त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा, नाही तर आम्ही त्यांना मारणार, असे सांगत कुडाळवासीय संतप्त झाले होते.
सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र
ही घटना समजताच राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष व उपसरपंच
भाजपाचे बंड्या सावंत, अमित सामंत, प्रसाद शिरसाट तसेच अन्य पक्षाचे तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत या घटनेचा निषेध करीत सुमारे दोन तास आंदोलन केले. निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडल्यानंतर सर्व पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला होता. तसेच हे एसआरपीएफ पथकही गुरुवारी सायंकाळी जाणार होते. मात्र, या जवानांमुळे ही घटना घडल्याने जनता रस्त्यावर उतरली आणि या जनतेला समजाविताना पोलीस मात्र हैराण झाले.
सर्व जणांना पोलीस ठाण्यात नेले
रस्त्यावर जनतेचे आंदोलन सुरू असताना कुडाळ पोलिसांनी तत्काळ या एसआरपीएफ पथकाला कुडाळ पोलीस स्थानकात आणले. सर्व जनतेने पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. या ठिकाणी आम्ही घडलेल्या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी आलो असताना त्याच पथकातील जवान आमच्यावर बंदुका रोखतात, हे अत्यंत चुकीचे असून हे जवान इथे शांतता ठेवायला आले आहेत का लोकांना मारायला, असा सवाल जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांना विचारला. या घटनेवेळी या पथकातील काही जवान दारूच्या नशेत होते. त्यामुळे तत्काळ त्यांची वैद्यकीय तपासणी करा, या कुडाळवासीयांच्या मागणीनंतर या जवानांना वैद्यकीय तपासणीकरिता पाठविण्यात आले. कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक उत्तम चौरे, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे जगदीश शिंदे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार परदेशी तसेच अन्य अधिकारी, चेन्नईच्या पथकाचे प्रमुख रोणी केचेरियन उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मारहाणीच्या प्रकारानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत जवानांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यात नारायण राणे, वैभव नाईक, प्रसाद रेगे, अमित सामंत आदींचा समावेश होता.