हप्तेखोरांचे दुकान बंद
By admin | Published: September 15, 2014 04:23 AM2014-09-15T04:23:53+5:302014-09-15T04:23:53+5:30
मुंबईत फेरीवाल्यांची संख्या दोन ते अडीच लाखांच्या घरात असली तरी दरमहा काही हजार रुपये महसूल पालिकेकडे जमा होत आहे़
शेफाली परब-पंडित, मुंबई
मुंबईत फेरीवाल्यांची संख्या दोन ते अडीच लाखांच्या घरात असली तरी दरमहा काही हजार रुपये महसूल पालिकेकडे जमा होत आहे़ त्याचवेळी फेरीवाले मात्र नियमित वॉर्डाला पैसे मोजत असल्याचा दावा करीत असतात़ मधल्यामध्येच गायब होणारा हा पैसा तिजोरीपर्यंत पोहोचविण्यास फेरीच्या व्यवसायानुसार ठरावीक शुल्क आकारण्यात येणार आहे़ यामुळे पालिकेतील हप्तेखोरांचे दुकान मात्र बंद होण्याची चिन्हे आहेत़ एका महिन्यांत ही योजना तयार होणार आहे.
मुंबईत १५ हजार परवानाधारक फेरीवाले आहेत़ मात्र रेल्वे स्थानक, बस स्थानक, पदपथ, रस्ते, स्कायवॉकवरही फेरीवाले दिसतात़ या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याचा दावा पालिका करते़ परंतु पालिकेची गाडी पोहोचण्यापूर्वीच फेरीवाले आपले दुकान गुंडाळून पळ काढतात़ वॉर्डातून त्यांना ही कुणकुण लागते कशी आणि हप्तेबाज नेमके कोण? याचा शोध काही पालिकेला लागलेला नाही़
त्यामुळे फेरीवाला धोरणानुसार मुंबईतील फेरीवाल्यांची नोंदणी होत असताना ही हप्तेबाजी बंद करण्याचे पाऊलही प्रशासन उचलणार आहे़ लोकसंख्येच्या अडीच टक्के म्हणजे अडीच ते तीन लाख फेरीवाल्यांना सामावून घेताना त्यांच्याकडून किती महसूल तिजोरीपर्यंत पोहोचेल, याचाही अभ्यास सुरू आहे़ विविध प्रकारच्या फेरीच्या व्यवसायासाठी निरनिराळे शुल्क आकारण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़