कॉलेज-क्लासेसची ‘दुकानदारी’
By admin | Published: June 11, 2016 12:45 AM2016-06-11T00:45:18+5:302016-06-11T00:45:18+5:30
अकरावी प्रवेशासाठी शहरातील काही कॉलेज व क्लासवाल्यांची ‘दुकानदारी’ सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशन मधून समोर आले
राजानंद मोरे,
पुणे-अकरावी प्रवेशासाठी शहरातील काही कॉलेज व क्लासवाल्यांची ‘दुकानदारी’ सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशन मधून समोर आले आहे. कॉलेजमध्ये फक्त उपचारापुरते नाव घालून शिक्षण मात्र क्लासमध्ये देण्याबाबत त्यांच्यात जणू परस्पर सामंजस्य करार झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्कही घेतले जात आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्जाचा दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार विद्यार्थी-पालकांकडून कॉलेजचे पसंतीक्रम भरण्यासाठी विविध सुविधा, अभ्यासक्रमांची माहिती घेण्यासाठी धावपळ केली जात आहे. या धावपळीत शहरात काही खासगी क्लासवालेही सक्रिय झाले आहेत. देशातील ‘आयआयटी’ संस्थांसह इतर केंद्रीय संस्थांच्या प्रवेशपरीक्षा, ‘नीट’, राज्यस्तरीय सीईटी या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी अकरावीपासून या क्लासवाल्यांकडे जातात. ही संधी साधत काही क्लासचालकांनी थेट कॉलेजशीच संगनमत करून आपली दुकानदारी सुरू केली आहे. क्लासशी ‘टायप’ असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यास वर्गातील ७५ टक्के उपस्थितीला बगल देण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना मिळत आहे. विद्यार्थी-पालकांकडून या ‘सुविधे’चा लाभ घेण्यासाठी गर्दी होत आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील मध्यवस्तीतील एका कॉलेजमध्ये जाऊन याबाबत शहानिशा केली. या कॉलेजमध्ये गेल्यानंतर, दहा-बारा पालक व विद्यार्थी याबाबतची चौकशी करण्यासाठी आले होते. काही विद्यार्थ्यांना एका क्लासचालकाने काही कॉलेजची नावे ‘एसएमएस’ करून संबंधित ठिकाणी जाऊन प्रवेश घेण्याबाबत सांगितल्याचे दिसून आले. या कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांनी थेट कोणत्या क्लासमधून आला, अशी विचारणा केली. केवळ माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितल्यानंतर, तेथील कॉलेजच्या प्रतिनिधीने काही क्लासची नावे घेतली. या क्लासमध्ये प्रवेश घेतल्यानंतर, या कॉलेजमध्ये हजेरीबाबत सवलत दिली जाते. कॉलेजमधील वर्गात उपस्थिती नसली तरी चालते, केवळ प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेला हजेरी लावणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगून टाकले. तसेच, कॉलेजचे प्रवेश शुल्क ३० हजार रुपये सांगण्यात आले, तर वर्गात न बसण्याची सवलत देण्यात येत असल्याने त्याचे १० हजार रुपये अधिकचे शुल्क द्यावे लागेल, असा खुलासाही कॉलेजकडून करण्यात आला. आॅनलाइन प्रक्रियेमध्ये पसंती क्रम कसा भरायचा, माहिती पुस्तिकेत कॉलेजची माहिती कोणत्या पानावर आहे, याबाबतची सविस्तर माहितीही देण्यात आली.
>कॉलेज प्रतिनिधी व लोकमत प्रतिनिधीमध्ये झालेला संवाद
लोकमत प्रतिनिधी : मामाच्या मुलाला दहावीला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. त्याला आयआयटी प्रवेशासाठी तयारी करायची आहे. पूर्णवेळ क्लासलाच द्यायचा आहे. कॉलेज पूर्णवेळ करता येणार नाही.
कॉलेज प्रतिनिधी : कोणत्या क्लासमधून आलात?
लो. प्र. : तो सातारा येथे असतो. आता पुण्यात येणार आहे. अजून क्लासमध्ये प्रवेश घेतला नाही.
कॉ. प्र. : (क्लासची नावे घेत) या क्लासमधून आला तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. केवळ प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेला हजर राहावे लागेल. वर्गात उपस्थिती नसली, तरी चालेल. प्रात्यक्षिकसाठी क्लासच्या वेळेनुसार अॅडजेस्ट करून आठवड्यातून दोनदा कॉलेजमध्ये यावे लागेल.
लो. प्र. : याच क्लासमध्ये प्रवेश घ्यावा लागेल का?
कॉ. प्र. : कॉलेजचे टायप असल्याने सवलत दिली जाते.
लो. प्र. : फी कशी असेल?
कॉ. प्र. : कॉलेजची फी ३० हजार रुपये आहे. त्यामध्ये कॉलेजचा ड्रेस, पुस्तके, इतर साहित्य दिले जाईल आणि १० हजार रुपये सवलतीसाठीचे असे एकूण ४० हजार रुपये शुल्क भरावे लागेल.
लो. प्र. : क्लासमधून आलो किंवा इथून क्लासमध्ये गेलो तरी हिच फी असेल का?
कॉ. प्र. : कसेही अॅडमिशन घेतले, तरी हीच फी असेल. तुमचे नाव येथील नोंदवहीत नोंदवा. आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
पहिला पसंती क्रम भरा
कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आॅनलाइन अर्जाच्या दुसऱ्या भागात पसंती क्रम भरणे बंधनकारक आहे. याबाबत कॉलेज प्रतिनिधीकडून माहिती घेतली. त्यांनी माहिती पुस्तिकेमधील कोणत्या पानावर कॉलेजचे नाव आहे, त्यामध्ये कॉलेजचा क्रमांक कोणता आहे, हे लिहून दिले. तसेच, हा क्रमांक पहिला पसंती क्रम म्हणून टाकायचा. ९१ टक्के गुण असल्याने इथे प्रवेश मिळेल.
कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी क्लासचालकांनीच शहरातील काही कॉलेजची नावे एसएमएसद्वारे कळविल्याचे सांगितले. या कॉलेजसह शहर, उपनगरांतील काही नामांकित कॉलेजच्या नावांचा ‘एसएमएस’ या विद्यार्थ्यांनी दाखविला. या कॉलेजशी संबंधित क्लासचा ‘टायप’ आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार यातील कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन हजेरीतून सुटका मिळविता येते.
७५ टक्के हजेरीला केराची टोपली
कॉलेजमध्ये वर्गात ७५ टक्के हजेरी असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही; मात्र स्टिंग आॅपरेशनमध्ये या हजेरीला केराची टोपली दाखविली जात असल्याचे समोर आले. क्लासकडून आलेल्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी कॉलेजचे तोंड पाहायचे, इतर वेळचे सर्व शिक्षण क्लासमध्येच पूर्ण केले जाईल, अशी आगळी शिक्षणपद्धती तयार झाल्याची गंभीर बाब आढळून आली. त्यामुळे कॉलेजकडून विद्यार्थ्यांची ७५ टक्के हजेरी कशा पद्धतीने लावली जाते, हेही दिसून येते. शिक्षण विभागाकडूनही केवळ कॉलेजकडून कागदोपत्री दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवला जातो.