दिवाळीची खरेदी शिगेला
By admin | Published: October 31, 2016 01:40 AM2016-10-31T01:40:43+5:302016-10-31T01:40:43+5:30
दिवाळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत.
पिंपरी : दिवाळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरेदीला लोकांकडून जास्त प्रतिसाद मिळत असल्याने व्यावसायिक वर्गसुद्धा खूश असल्याचे चित्र दिसत आहे.
शाळा, शासकीय कार्यालये आणि खासगी कंपन्यांना असल्याने अनेकजण सहकुटुंब खरेदीला आल्याचे दिसून येत आहे. दिवाळीसाठी नवीन कपडे, किराणा माल, फटाके, सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील कपड्यांच्या दुकानांमध्ये लहान-थोरांकडून गर्दी केली जात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर फ्रिज, टीव्ही, तसेच मोबाइलसारख्या इतर अद्ययावत वस्तू खरेदीलादेखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. नवीन दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या खरेदीसाठी नागरिक गाड्यांच्या शोरूमला गर्दी करू लागले आहेत. चैनीच्या वस्तूंवरील प्रस्तावित करवाढ लागू होण्याआधी नागरिकांकडून वाहन खरेदी होताना दिसत आहे. पिंपरी शहरातील बाजारपेठ सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी सोईची आहे. तसेच लोकलची सुविधा असल्याने मावळ परिसरातूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी येत आहेत. गेल्या वर्षीचा दुष्काळ यंदा पावसाने धुऊन काढला असल्याने मावळातील शेतकऱ्याची दिवाळी जोरात असल्याचे त्याच्या खरेदीवरून दिसून येत होते. शहरातील मॉलही गर्दीने तुडुंब भरले आहेत. एकाच छताखाली कपडे आणि किराणा वस्तू मिळत असल्याने बाजारातील धावपळ टाळण्यासाठी अनेकांनी मॉलमधून खरेदी करण्याला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
>देशी वस्तूंना मागणी : चिनी वस्तूंचा खप घटला
उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक संघटनांकडून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचा परिणाम बाजारात पाहायला मिळाला. अनेक ग्राहकांकडून विजेच्या माळा, पणत्या, आकाशकंदील अशा चिनी बनावटीच्या वस्तू नाकारण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे दीड महिन्यापूर्वीच व्यावसायिकांनी मालाची आॅर्डर दिलेली असते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत चिनी वस्तूंचा ३० खप टक्क्यांनी घटल्याने तोटा सहन करावा लागणार, असे एका दुकानचालकाने सांगितले. याउलट बांबूपासून बनविलेले, कापडी आकाशदिवे, पणत्या अशा देशी बनावटीच्या वस्तूंना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. या वस्तूंच्या किमती चिनी बनावटीच्या वस्तूंपेक्षा जास्त असतात. मात्र लोकांकडून देशी वस्तूंना पसंती मिळत आहे.
यंदा मिठाईला सर्वात जास्त मागणी असल्याचे दिसून आले. विशेष करून ड्रायफ्रूट्स आणि काजूकतली खरेदी करण्याकडे लोकांचा जास्त कल दिसून आला. खासगी कंपन्या, शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वात जास्त मिठाई खरेदी करण्यात आली.
मिठाईचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मिठाईला यंदा मागणी जास्त असली तरी किंमती स्थिर असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.