१५ वर्षांतील खरेदीची चौकशी
By admin | Published: July 31, 2015 02:57 AM2015-07-31T02:57:56+5:302015-07-31T02:57:56+5:30
महिला व बालकल्याण विभागाने गेल्या १५ वर्षांत केलेल्या सर्व खरेदीची मुख्य सचिवांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.
मुंबई : महिला व बालकल्याण विभागाने गेल्या १५ वर्षांत केलेल्या सर्व खरेदीची मुख्य सचिवांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. चिक्की खरेदीतील कथित घोटाळ्यावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुराव्यांची जंत्री सादर करत जोरदार हल्लाबोल केला. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन, असे आव्हान दिल्याने मुंडे विरुद्ध मुंडे असा अभूतपूर्व सामना पाहायला मिळाला.
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच महसूलमंत्री एकनाथ खडसे या मंत्र्यांच्या खात्याकडून झालेल्या खरेदीमधील भ्रष्टाचार व अनियमितता याबाबतची चर्चा विरोधी पक्षाने नियम २६० अन्वये उपस्थित केली होती. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वस्तूत भ्रष्टाचार करणे ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे या प्रकरणाची विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून अशा भ्रष्ट सरकारमध्ये शिवसेनेने
क्षणभरही राहू नये, असा सल्ला त्यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)
गरिबाच्या तोंडचा घास खाणार नाही
माझ्याकडून एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला असेल तर मी स्वत:हून राजकारणातून बाहेर जाईन. पण मी राजकारणातून बाहेर जाण्यासाठी कुणी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असेल तर तो मी यशस्वी होऊ देणार नाही, अशा शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिआव्हान दिले.
मी लहान असल्याने व महिला असल्याने मला लक्ष्य केले जात आहे. परंतु मी सक्षम असून अशा चुका करण्यास इथे आलेली नाही. दलित, गोरगरीब यांच्या तोंडचा घास खाणारी मी नाही. विरोधी पक्षनेत्यांनी संस्कृतीच्या केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून पंकजा म्हणाल्या की, एक महिला सक्षमपणे काम करत असताना तिला घेरणे ही आपली संस्कृती नाही. माझे फोटो लावून प्लॅटफॉर्मवर चिक्की विकणे, अवमानित करणे हे अन्यायकारक आहे. या सर्वोच्च सभागृहात वैयक्तिक द्वेषाचे राजकारण पेरले जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
राणे यांच्यावर आरोप
नारायण राणे उद्योगमंत्री असताना चिक्की खरेदी ही सूर्यकांता इंडस्ट्रीजकडूनच करण्याचे आदेश त्यांनी काढले होते. खात्याच्या सचिवांनी त्याला आक्षेप घेतल्यावरही तो दुर्लक्षित करून राणे यांनी आपले आदेश कायम ठेवले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. १८ आॅगस्ट २०१५ पर्यंत सूर्यकांताला मागील सरकारने मुदतवाढ दिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.