आता वह्या खरेदी घोटाळा!
By Admin | Published: June 27, 2015 02:43 AM2015-06-27T02:43:46+5:302015-06-27T02:43:46+5:30
राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता आढळून आली असून,
यदु जोशी, मुंबई
राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता आढळून आली असून, ई-टेंडर पद्धतीने केलेल्या या खरेदीवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेतली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांचे एकाहून एक प्रताप समोर येत असल्याने फडणवीस यांच्यापुढे वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.
याबाबत ‘लोकमत’च्या हाती आलेली माहिती अशी - आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीसाठी गेल्या फेब्रुवारीमध्ये ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. १० कंत्राटदारांनी निविदा भरल्या; पण एका विशिष्ट कंत्राटदारालाच कंत्राट मिळावे यासाठी अटी व शर्ती बदलण्यात आल्या. याबाबत काही कंत्राटदारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या खरेदी प्रक्रियेबाबत आश्चर्य व्यक्त करीत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशीचे आदेश दिले. गंमत म्हणजे चौकशी अहवालात आक्षेपाच्या १४ मुद्द्यांपैकी केवळ तीनच मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्यात आले. तूर्त ही खरेदी थांबवण्यात आली आहे. २०० पेजेसची वही बाजारात जास्तीतजास्त १८ ते २० रुपयांना बाजारात मिळत असताना ३१ रुपये दराने कंत्राट देण्याचे घाटत आहे, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. याच वहीचा पुरवठा २० रुपये दराने करण्याची तयारी अन्य काही कंत्राटदारांनी दाखविली होती.
...अन् न्यूनतम दराचा आदेश निघाला
न्यूनतम दर नमूद करणाऱ्या कंत्राटदारालाच कंत्राट देण्याची आजवरची पद्धत बंद करण्यामागे आदिवासी विकास विभागातील हीच खरेदी कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते. वस्तूंची अव्वाच्यासव्वा किंमत लावून खरेदी केली जाते. त्याला चाप लावणारा निर्णय मुख्यमंत्र्यांनी काल घेतला.