आराेग्य विभागात १५ हजार कर्मचाऱ्यांचा तुटवडा, रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 05:29 AM2021-02-14T05:29:52+5:302021-02-14T06:42:49+5:30
health department : विद्यमान कार्यरत तसेच कंत्राटी स्वरूपात सामावून घेतलेल्यांच्या भरवशावर लढाई सुरू होती. मात्र, कंत्राटींची सेवाही आता खंडित करण्यात आली आहे.
- विलास गावंडे
यवतमाळ : ग्रामीण आरोग्याचा डोलारा सांभाळत असलेल्या कर्मचाऱ्यांचा राज्यात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गट-ड आणि क मधील १५ हजार ४९० पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, हिवताप, कुष्ठरोग विभागातील या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत असून सर्वाधिक ३ हजार २९१ रिक्त पदे हिवताप व जलजन्य रोग सहसंचालक आरोग्यसेवा (पुणे-६) या कार्यालयात रिक्त आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी मनुष्यबळ अपुरे पडत आहे.
विद्यमान कार्यरत तसेच कंत्राटी स्वरूपात सामावून घेतलेल्यांच्या भरवशावर लढाई सुरू होती. मात्र, कंत्राटींची सेवाही आता खंडित करण्यात आली आहे. एवढी गंभीर स्थिती असतानाही आरोग्य विभागात रिक्त पदांच्या अनुशेषाबाबत कमालीची उदासीनता आहे. आरोग्य सेवक, परिचारिका, लॅब टेक्निशिअन, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, लिपिक या महत्त्वपूर्ण पदांची भरती झालेली नसल्याने रिक्त पदांची संख्या वाढतच आहे.
कार्यक्रम प्रमुख आणि आरोग्यसेवा प्रभारी मंडळांमध्ये रिक्त जागांची लांबलचक यादी आहे. या विभागासाठी एकूण ३१ हजार ५४६ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २१ हजार २० कर्मचारी कार्यरत आहेत. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत गट-क संवर्गातील दहा हजार ५२६ जागा रिक्त आहेत. उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर मंडळासाठी तीन हजार ४३ पदे मंजूर असताना केवळ १७८५ कर्मचारी कार्यरत आहेत. १२५८ जागा या विभागात रिकाम्या आहेत. उपसंचालक अकोला मंडळात २६८१ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात १८६० कार्यरत असून ८२१ जागा रिक्त आहेत. याशिवाय लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक, ठाणे मंडळांसह उपसंचालक आरोग्यसेवा कार्यालयांमध्येही रिक्त पदांची संख्या हजारोंच्या घरात आहे.
परिचरांच्या पाच हजार जागा रिकाम्या
गट-ड संवर्गातील परिचर, शिपाई अशी चार हजार ९१४ पदे सद्यस्थितीत रिकामी आहेत. या संवर्गात १३ हजार ११० पदांना मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्षात आठ हजार १९६ कर्मचारी कार्यरत आहेत. सर्वाधिक ७१२ जागा उपसंचालक आरोग्यसेवेच्या नाशिक मंडळ कार्यालयात रिक्त आहेत. या ठिकाणी मंजूर असलेल्या १८४० कर्मचाऱ्यांपैकी ११२७ लोक कार्यरत आहेत. आरोग्यसेवा संचालक मुंबई, हिवताप व जलजन्य रोग सहसंचालक पुणे, उपसंचालक ठाणे, कोल्हापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर मंडळाला रिक्त पदांनी पोखरले आहे.