CoronaVirus: रुग्ण वाढतायत! आरोग्य कर्मचारीच बाधित होऊ लागले; राज्य सरकारसमोर मोठी चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 09:23 AM2022-01-07T09:23:48+5:302022-01-07T09:24:08+5:30
परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेत औषधांची कमतरता होती, तर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची, तिसऱ्या लाटेत मात्र फ्रंटलाइन वर्कर मोठ्या प्रमाणावर बाधित होत असल्याने मनुष्यबळाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची कमतरता भासल्यास कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची परवानगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी सांगितले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री देशमुख म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये काम करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, पॅरामेडिकल कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉन विषाणूची बाधा होताना दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर अथवा पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची कमतरता भासल्यास कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ भरले जाईल.
शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमडेसिविरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता
अशा विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा याची दक्षता घ्यावी. ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनची बाधा होत आहे. त्यामुळे डॉक्टर अथवा पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची कमतरता भासल्यास कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ भरले जाईल, असे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. विविध विषयांवर चर्चा झाली.
संसर्ग घशापर्यंतच
तिसऱ्या लाटेमध्ये सध्या फुप्फुसापर्यंत हा संसर्ग पोहोचत नाही. केवळ घशापर्यंत संसर्ग मर्यादित आहे. घसा, नाकापर्यंत लक्षणे आढळतात. घशात खवखव, सर्दी होणे, अशी लक्षणे जाणवत असल्याचे टोपे म्हणाले. रुग्ण संख्येत वाढ होत असली तरीही रुग्णालयातील खाटा मोठ्या संख्येने रिक्त आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही.