सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 04:03 PM2024-11-27T16:03:19+5:302024-11-27T16:05:15+5:30
Bacchu kadu: विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक अपयश पदरी पडल्यानंतर बच्चू कडू यांनी आता जनतेला पुढच्या राजकीय वाटचालीबद्दल विचारले आहे.
Bacchu Kadu News: राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात महायुतीशी थेट लढत असलेल्या महाविकास आघाडीची दाणादाण झाली. तर छोटे पक्ष पालापाचोळ्यासारखे उडाले. बच्च कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षालाही मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असून, बच्च कडू यांनाही मतदारांनी झटका दिला. त्यानंतर आता बच्चू कडूंनी पुढील राजकीय वाटचालीला सुरूवात केली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे बच्चू कडू यांनी जनतेला प्रश्न विचारले असून, प्रहार जनशक्ती पक्षाने पुढील वाटचाल कोणत्या मार्गाने करावी, याबद्दल सूचना मागवल्या आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
पुढील काळात प्रहारने आपला राजकीय प्रवास कसा करावा, या विषयी आपले मत काय? प्रहारचा सेवेचा झेंडा यावेळी खाली आला. पुढील काळात प्रहारने आपला राजकीय प्रवास कसा करावा, याविषयी आपले मत काय? सत्तेमध्ये सहभागी असावे की सत्तेबाहेर? धर्म-जात याचा झेंडा हाती घ्यावा की सेवेचा वसा सुरू ठेवावा?, असे प्रश्न बच्चू कडू यांनी विचारले असून, जनतेकडून याबद्दल सूचना मागवल्या आहेत.
पुढील काळात प्रहारने आपला राजकीय प्रवास कसा करावा, या विषयी आपले मत काय ? pic.twitter.com/2wySnGx8Wf
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) November 27, 2024
भाजपच्या तायडेंनी कडूंचा केला पराभव
बच्चू कडू यांनी अचलपूर या त्यांच्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात तिहेरी लढत झाली. बच्चू कडू यांच्यासोबत काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख आणि भाजपचे प्रवीण तायडे यांनी निवडणूक लढवत होते.
भाजपचे प्रवीण तायडे हे निवडणुकीत विजयी झाले. तायडे यांनी बच्चू कडू यांचा तब्बल १२ हजार मतांनी पराभव केला. प्रवीण तायडे यांना ७८ हजार २०१ मते मिळाली. बच्चू कडू यांना ६६ हजार ७० मते मिळाली. काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांना ६२ हजार ७९१ मते मिळाली. बच्चू कडू दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर देशमुख तिसऱ्या क्रमाकांवर राहिले.